कबनूर / ता : ३०

कबनूर ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीची मुदत आठ ऑगस्टला संपणार आहे . मुदत संपण्यापूर्वी घुसडून बेकायदेशीर घाईगडबडीत ठराव करुन घनकचरा प्रकल्पासाठी मशिनरी टेंडर प्रक्रिया रद्द करावी . यासह ग्रामविकास आधिकारी यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी कबनूर शिवसेना शहर प्रमुख प्रशांत जगताप यांनी जिल्हा परिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे .शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे की , ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराबाबत जिल्हा परिषदेकडे यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या आहेत .
घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले आहे . तरीही कोरोनाच्या महामारी मध्ये अनेक मूलभूत समस्या महत्त्वाच्या असताना टेंडर प्रक्रिया राबवणे योग्य आहे काय ? असा सवाल उपस्थित केला आहे
त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराबाबत बऱ्याच तक्रारी असून घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करून कोणतीही नोंद न घेता परस्पर खर्च केली जाते . प्रोसिडिंग बुक गायब झाले आहे . जलस्वराज्य प्रकल्पासाठी विनाकारण बोगस वारंवार खर्च कागदोपत्री दाखविला जात आहे . ग्रामपंचायतीची इमारत नूतनीकरण , कचरा डेपो ,फर्निचर , यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे . तरी त्याची चौकशी होऊन संबंधितावर दंडात्मक कारवाई करावी . अन्यथा उपोषण व उग्र आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे .
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख आण्णा शेट्टी , सागर कोले ,मुकुंद उरूणकर , भरत पोवार , सुनील नरंदेकर , शांतिनाथ कामत , योगेश कांबळे ,शशिकांत कांबळे ,शिवाजी सुतार ,मधुमती खराडे , प्रियांका सुतार ,ओंकार सुतार, आदींच्या निवेदनावर सह्या आहेत .