विधवा भावजयशी दीराची सप्तपदी ; वडाळ्यात ‘घरपण’ सांभाळत रुढी-परंपरेला छेद …..

अहमदनगर / प्रतिनिधी
   भाऊबंद, गावकरी व समाज काय म्हणेल याचा विचार न करता वडाळा बहिरोबा (ता.नेवासा जि.अहमदनगर) येथे आज विधवा भावजयी बरोबर लहान दीराचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करुन नवदांपत्यास शुभाशिर्वाद दिले.

     वडाळाबहिरोबा येथे हिन्दू धर्मातील रुढी परंपरेला छेद देत विधवा सुनेच्या आयुष्यात पतीच्या अपघाती निधनाने दाटलेल्या अंधाराला पुर्नविवाहाच्या निमित्ताने सास-यांनी प्रकाशाची वाट निर्माण करुन देत कुटुंबाच्या घराचं घरपण सांभाळले आहे. नात्याने दीर-भावजयीच्या या विवाह सोहळ्यात उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात या विधायक उपक्रमाचे स्वागत करत नवदांपत्यास शुभेच्छा दिल्या. विवाहासाठी सामाजिक कार्यकर्ते चांगदेव मोटे यांची मध्यस्थी यशस्वी झाली.
     संजय मोटे यांचा अभियंता असलेला मोठा मुलगा महेशचे दोन वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले.त्याची पत्नी प्राजंली सात महिन्याच्या बाळासह पोरकी झाली. प्राजंलीचे वडील बाळासाहेब गव्हाणे ( रा. राहुरी फॅक्टरी) निःशब्द झाले होते.आता मुलीचं कसं होणार या चिंतेत ते होते. सासरे संजय मोटे यांनी वडीलकीची भुमिका करत विधवा सुनेचा विवाह लहान मुलगा अभियंता महेंद्र बरोबर निश्चित केला. हा अगळावेगळा विवाह संपन्न झाला.

error: Content is protected !!