हातकणंगले/ प्रतिनिधी

कोल्हापूर-सांगली महामार्गावरून जाणाऱ्या गॅस पाईप लाईनमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शासनाने घालून दिलेले नियम व त्यांची जबाबदारी संबंधित कंपनी पाळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच संबंधित कंपनीचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांवर अरेरावीची भाषा वापरून जागा हस्तांतरित करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. तरी शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य मोबदला मिळत नाही. तोपर्यंत वेळप्रसंगी कंपनीचे काम बंद पाडू असा इशारा माजी आम.डॉ. सुजित मिणचेकर यांनी दिला आहे.
हातकणंगले येथील आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना डॉ. मिणचेकर म्हणाले , गेल गॅस कंपनीने शिरोली -हातकणंगले -शिरोली या मार्गावरून गॅस पाईप घालण्याचे काम सुरू केले आहे. परंतु हे काम करीत असताना संबधीत कंपनीने शासनाच्या नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत केलेली नाही. तसेच शासनाने दिलेल्या तूटपूंज्या मोबदल्या विरोधात काही शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली असलेची समजते. तरी देखील संबंधित कंपनी ही जागा स्वताच्या मालकीची समजून शेतकऱ्यांची जमिन हस्तांतरित करून लुबाडणूक करीत आहेत. यापूर्वी कोल्हापूर- सांगली महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली होती. ही वृक्षतोड भरून काढण्यासाठी गेल्या काही वर्षापासून नवीन वृक्षारोपण करून ही झाडे संगोपन केले आहेत. मात्र या कंपनीने झाडांची बेसुमार कत्तल करून आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशा बेजबाबदार कंपनीचे काम बंद पाडून योग्य तो शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देणे ही माझी सामाजिक बांधिलकी आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा गर्भित इशाराही मिणचेकरांनी दिला.