पाटण / ता.१५- विक्रांत कांबळे
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढू लागल्याने आज स्वातंत्रदिनाच्या दिवशीच कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून पावणे दोन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 10140 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करणेत आला आहे.
गेल्या आठ दिवसापासून कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण शनिवारी सकाळी धरणाची पाणीपातळी 2147.11 फूट आणि 86 टीएमसी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी निर्धारित करण्यासाठी कोयना सिंचन विभागाने हा निर्णय घेतला.
कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्या उपस्थित शनिवारी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 9 इंचाने उचलून कोयना नदीपात्रात 9360 क्यूसेक्स आणि पायथा विजगृहातून 1050 असे मिळून एकूण 10140 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना नदीपात्रात सुरू केलेल्या या विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रात कोसळणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याने कोयना काठावरील कराड,सांगली येथील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान कोयना परिसराला शनिवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला.मात्र या धक्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून कोयना धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे.
