दहावीचे पेपर अवघड गेले; ‘सत्यम’ने घेतला गळफास

गडहिंग्लज : दहावीचे पेपर अवघड गेल्याच्या मानसिक तणावातून येथील शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सत्यम लक्ष्मण कोळी (वय १६, मूळ गाव नूल, सध्या रा. स्वामी कॉलनी, गडहिंग्लज) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, मूळचे नूलचे रहिवासी असलेले कोळी कुटुंबीय येथील स्वामी कॉलनीत राहतात. वडील लक्ष्मण हे हैदराबाद येथे नोकरीला असून त्यांच्या पत्नी शिवानी मुलगा सत्यम व शुभमसह गडहिंग्लजमध्ये राहतात. सत्यम येथील माध्यमिक शाळेत दहावीत शिकत होता. 

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या दहावीच्या बोर्डाचे पेपर अवघड गेल्यामुळे तो तणावाखाली वावरत होता. पेपर अवघड गेल्यामुळे तो काहीसा नाराज देखील होता. काही कामानिमित्त आई माहेरी हेब्बाळला गेल्यामुळे तो घरी एकटाच होता. सोमवारी सकाळी त्याने बेडरूममधील छताच्या फॅनला गळफास घेतला.

आजूबाजूच्या नागरिकांनी उपचारासाठी त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अजित तळवार यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

error: Content is protected !!