‘ कास ‘ इतकेच ‘मसाईचे ‘ पठार पर्यटनाला खास ; रानफुलांची नयनरम्य सप्तरंगी उधळण; निसर्गप्रेमींची पर्यटन केंद्र घोषीत करण्याची मागणी …..

बोरपाडळे /श्रीकांत कुंभार
     कोल्हापुर जिल्ह्याच्या वनपर्यटन स्थळांच्या यादीत नव्याने विकसित होत असलेल्या ऐतिहासिक मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम बहरला असून या प्रती ‘कास ‘ पठारावरील निसर्गातील विविधरंगी रानफुले पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळमध्ये नव्याने उदयास येत असलेल्या पन्हाळा किल्ल्या जवळील मसाई पठारावर सध्या रानफुलांचा हंगाम सुरु असुन वेगवेगळ्या आकाराची, जातीच्या रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहण्यासाठी हौसी पर्यटक येथे दाखल होत आहेत. एरवी एका दिवसात कोल्हापूरसह पन्हाळा किल्ला तसेच जोतिबाची एकदिवसीय कौटुंबिक सहल करणारे पर्यटक आता मसाई पठाराला आवर्जून भेट देत आहेत.

     सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पन्हाळ्याच्या डोंगरमालेशी सलग्न असणारे मसाई पठारावर अलीकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. किल्ले पन्हाळगडापासून अवघ्या सात किमी अंतरावर हे पठार लहानमोठ्या दहा पठारांनी बनले असून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेल्या पन्हाळगड जवळ असल्याने वर्षभर आल्हाददायक हवा , हिरवेगार डोंगर दऱ्या कधी शीळ घालत येणारा तर कधी घोंगावत येणारा अंगाला झोंबणारा गार वारा दाट धुके मुसळधार कोसळणारा पाऊस हौसी पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना साद घालत आहे.जुन महिन्यापासून कोसळणाऱ्या धो धो पावसाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या वर्षसहली  गर्दीने तर जुलै ऑगस्ट महिन्यात पन्हाळा पावनखिंड पदभ्रमण मोहिमांच्या साक्षीने इथला निसर्ग बहरतो.
    श्रावणात कोसळणाऱ्या श्रावणसरी अंगावर झेलत ऊनपावसाचा खेळ पाहण्यासाठी अंगाला झोंबणारा गार वाऱ्यातही हौसी पर्यटक इथे गर्दी करतात.
     सध्या या पठारावर निसर्गाचा रंगीबेरंगी आविष्कार पाहण्यासाठी गर्दी होत आहे. हिरव्यागार गवताच्या मऊ गालीच्या वर विविध प्रकारच्या रान फुलांचे रंगीबेरंगी ताटवे, वाऱ्यावर डोलताना कधी एकट्याने तर कधी समूहाने वाढणारी रानफुले पाहून आपले कविमन जागृत होते. हौसी पर्यटकांबरोबर निसर्ग अभ्यासकांसाठी पर्वणी असलेल्या या पठारावर प्रवेश करताच सोनकीच्या पिवळ्या फुलांनी आपले स्वागत होते.हिरव्या हिरव्या मऊशार गवतावर ही फुले आपले लक्ष वेधून घेतात. ड्रासेरा,रान तेरडा ,नीलिमा, नीलचिराईत, केना यासारखी रानफुले रानहळद ,रानआले रणकोथिंबीर या बरोबर निळ्या फुलांची भारांगीची झुडपे इथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात.

     मसाई पठार जांभ्या खडकापासून बनले असल्याने कळ्या खडकावर फुलणारी भुईआमारीच्या (ग्राउंड अर्किड) सहा ते सात प्रजाती येथे सापडतात. सध्या येथे रान कोथिंबीर, सफेद मुसळी, नीलवंती , मंजिरीबरोबर सीतेची आसवे, केना, पेनवासारख्या असंख्य जातीच्या , रंगाची, आकाराची, छोटीमोठी रानफुले वाढली आहेत.याबरोबरच मसाई पठारावर अनेक रानफुलांच्या दुर्मिळ रान फुलांच्या, वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. यामध्ये कंदील फुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती, दिपकाडी, काळी मुसळी ,आणि सफेद गेंदा च्या दहा प्रजातींचा समावेश आहे. पांढऱ्या फुलांची दिपकाडी, कापरू, ड्रासेरा च्या अनेक प्रजाती बरोबर दाट झुडपामध्ये आढळणारे जंगली सुरण(सापकांदे)
लक्ष वेधून घेतात.
     मसाई पठारावर अनेक छोटे मोठे निसर्गनिर्मित तलाव असून वनविभागाच्या वतीने अनेक वनतलाव खोदण्यात आले आहेत. या तलावांच्या काठावर पाणथळ परिसरातही मोठ्या संख्येने फुले फुलतात.यामध्ये मिकीमाउसची फुले लक्ष आकर्षित करतात.मोठी पिवळी फुले आणि त्यावर लाल रंगाचे दोन ठिपके असतात त्यामुळे स्मिथीयाची ही फुले आपले लक्ष वेधून घेतात.स्थानिक भाषांमध्ये या रानफुलांना वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.अग्नीशिखा नावाने परिचित असणारी कळलावीची लालभडक फुले तर मोठ्या संख्येने फुलली असून पठारावरील छोट्या मोठ्या दर्याही आता रानफुलांनी बहरल्या आहेत. पावसाळा अंतिम टप्प्यात आला असताना निसर्गाची ही रंगीबेरंगी दुनिया अनुभवण्यासाठीमसाई पठार आता फुलले असून कोल्हापूरचे हे प्रतिकास पठार पाहण्यासाठी पर्यटकाबरोबर निसर्ग अभ्यासकांची पावले ही पठाराकडे वळत आहेत.
      पन्हाळा किल्ला परिसरात हे पठार असून पर्यटकांना राहण्याची सोय गडावर तसेच जेवण व नाष्ट्याचीसोय
या परिसरात उपलब्ध असून पर्यटकांच्या मागणी नूसार घरगुती पद्धतीने जेवण करून दिले जाते.तसेच वनविभागाच्यावतीने या परिसरात वनपर्यटनाच्या माध्यमातून नवनव्या साहसी क्रिडाप्रकारांचा समावेश असणारे पर्यटनकेंद्र उभारले जात असून येत्या काही दिवसात मसाई पठार एक नवे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल अशी आशा आहे.

मसाई पठारावर फूललेल्या फुलांचा नैसर्गिक अविष्कार (फोटो संजय सौंदलगे )

error: Content is protected !!