बोरपाडळे / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पन्हाळा बांधारी परिसरात शतकोत्तर वर्षांची परंपरा असणारा जेऊर (ता. पन्हाळा ) येथील चिलेश्वर भैरवनाथ मंदिरातील दसरा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त भीमराव पाटील यांनी दिली. जेऊर ग्रामस्थ, भक्तगण आणि पोलीस प्रशासन यांच्यात मारूती मंदिर येथे झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोडोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
परमपुज्य सदगुरू चिले महाराज यांचे जन्मगाव असणाऱ्या जेऊर येथील दसरा महोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मसाई पठाराच्या पायथ्याशी असलेल्या जेऊर गावच्या पश्चिमेला निसर्गरम्य परिसर असलेल्या भैरवनाथ मंदिरात दरवर्षी दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मंदिरात भैरवनाथाची पितळी घोड्यावर बसलेल्या रुपात प्रतिष्ठापना केली जाते. तर मसाई देवी पाषाणरुपात तर परमपुज्य सदगुरू चिले महाराज यांची भव्यरुपात बैठी मुर्ती साकारण्यात आली . आहे. नवरात्र काळात होणाऱ्या विविध कार्यक्रमांबरोबर पालखी सोहळा, सासनकाठ्यांची भव्य मिरवणूक होते. तसेच या दिवशी गावची मुख्य यात्रा असते. त्यामुळे ग्रामस्थांबरोबर परिसरातील भक्तगण या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होतात.
कोरोना पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत शासन निर्णयाची माहिती देण्यात आली.बोरपाडळे आरोग्य उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या बांधारी परिसरातील जेऊरसह सर्वच गावांनी अजूनही कोरोना संकटास वेशीवर थोपवले आहे. त्यामुळे दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा शिरकाव होऊ नये . म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे.
कोडोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरज बनसोडे बैठकीत प्रशासनाची बाजू स्पष्ट करताना शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे , बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेनंतर सर्वांनुमते यंदाचा दसरा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ट्रस्टतर्फे नित्य पुजा, नवरात्र काळात होणारे सर्व धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर परिसरात सोशल डिस्टंस राखण्याबरोबरच मास्कचा वापर बंधनकारक असून मंदिरात कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. उत्सवकाळात मंदिर भाविकांसाठी बंद राहणार असून मुख्य पालखी सोहळा, सासनकाठ्यांची मिरवणूक तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी भैरवनाथ चिलेश्वर देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष रंगराव डावरे, सचिव तानाजी पाटील,विश्वस्त दिलीप खांडेकर, मारूती पाटील, सुभाष माने,महिपती पाटील यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.