धन्य ती पराक्रमाची माती..
धन्य तो महाराष्ट्र..
धन्य ते स्वराज्य..

खरंच धन्य धन्य आहे हा महाराष्ट्र, ज्याला साक्षात जिजाऊंचा सहवास लाभला आहे.. ज्या माऊलीने कष्टकरी, शेतकरी व सर्वसामान्य लोकांना राज्य निर्माण करून देण्यासाठी दोन छत्रपती आपल्या संस्कारातून घडवून या देशाला अर्पण केले त्या राजमाता जिजाऊंची आज जयंती..
१२ जानेवारी १५९८ ला राजमाता जिजाऊ यांचा जन्म सिंदखेड नावाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखोजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊ यांचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊ यांच्या कानावर होते. वय लहान होत, पण पारतंत्र्याची जाणिव त्या वयात वाढत होती. लाचारीच्या आणि फितुरीच्या लोकांचा त्यांना मनापासून तिरस्कार वाटू लागला.
” ज्या वयात बाहुल्यांची खेळणी मांडून संसाराची तालीम करण्यात लहान मुलं रममाण (दंग) असतात. त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ पकडण्यात दंग होत्या. “
म्हणजेच लहान वयातच ठरलं होतं अन्यायाविरुद्ध तलवार उगारून आपल्याला स्वराज्य, स्वतःच राज्य निर्माण करायचं आहे. पुढे जिजाऊंचा विवाह शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. आणि या वाघिणीच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३० ला नरसिंहाचा जन्म झाला. त्या नरसिंहाच नाव होत शिवाजी. या मातेने थोर संतांच्या विचारांची शिकवण बाळ शिवबांना लहान वयातच दिली. आणि या विचारांतून व जिजाऊंच्या संस्कारातून शिवराय घडले. या मातेची स्वराज्य-भक्ती इतकी निस्सिम होती जेव्हा महाराष्ट्रावर अफझलखानच सैतानी संकट आलं, अफजलखान शिवाजी महाराजांवर चालून आला त्यावेळी अफझलखानाच्या भेटीला जाताना महाराज आईसाहेबांच्या दर्शनासाठी आले. तेव्हा महाराज म्हणाले आईसाहेब….!
आम्हाला आमच्या जिवाची पर्वा नाही पण, तुमची स्वराज्याची काळजी वाटते…
तेव्हा ती वाघिण म्हणाली…! राजे जर तुम्ही मेलात तर ही जिजाऊं समजुन जाईल की आम्ही पहिल्या पासुनच निपुत्रिक होतो. पण आमच्या काळजीने तुमची पावले रेंगाळू देवू नका.. जा राजे स्वराज्यावर आलेलं हे सैतानी संकट निस्तनाभूत करा. ही माऊली स्वराज्यासाठी आपलं पोर अर्पण करण्यास तयार होती. इतकी निस्सीम स्वराज्य भक्ती या मातेची होती.
जसे शिवरायांवर संस्कार जिजाऊंनी केले, तसेच संस्कार संभाजी महाराजांवर केले. त्यामुळेच औरंगजेबानं संभाजी राजांचे मस्तक छाटले पण ते मस्तक त्या औरंजेबासमोर समोर नतमस्तक झालं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य हेच सर्वस्व मानून माता भगिनींच, सर्वसामान्य लोकांचं राज्य निर्माण करणाऱ्या या माऊलीला साष्टांग दंडवत..
प्रथमेश इंदुलकर
(युवावक्ते/ लेखक)
७७५७०८६०२४