आर्मी भरतीसाठी धावणाऱ्या युवकाचा चटका लावणारा मृत्यु ; आई वडील हतबल , गावावर शोककळा

गारगोटी /आनंद चव्हाण
     गेल्या वर्षी गावातील चार युवक आर्मी भरती होऊन देशाचे संरक्षण करू लागलेत, हाच देशसेवेचा आदर्श घेऊन आपण ही जोरदार सराव करून सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करायची हे स्वप्न बाळगून धावण्याचा सराव करणाऱ्या एका युवकाला प्राणाला मुकावे लागले, धावताना थांबल्यानंतर हृदयविकाराचा तीव्र झटका आलेने १९ वर्षीय युवकाचा चटका लावणारा मृत्यू झाला, महालवाडी (ता. भुदरगड ) येथे ही घटना घडली, कु. सूरज मारुती इंदुलकर असे दुर्दैवी युवकाचे नाव आहे.


      गेल्या एकाच वर्षात पाचशे लोकवस्तीच्या या छोट्या गावातील चार युवक सैन्यदलात भरती झाले, त्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन गावातील अनेक युवक सैन्यदलात भरतीसाठी प्रयत्न करत आहेत, दररोज पंधरा ते वीस युवक पहाटे पाचच्या दरम्यान महालवाडी ते म्हसवे असा पाच किलोमीटर धावण्याचा सराव करतात, नेहमीप्रमाणे सूरज मित्राबरोबर आज सकाळी पहाटे धावत होता, म्हसवे येथे जाऊन तो परत येत होता, मुलाची धावण्याची स्पर्धा चालू होती, दरम्यान त्याच्या छातीत कळ आलेने तो थांबला, आणि हृदयविकाराचे तीव्र झटका आलेने त्याचा जागीच मृत्यू झाला.
     घरची परिस्थितीअत्यंत गरिबीची , आई वडील मोलमजुरी करून एकुलत्या एक मुलग्याला मोठं केलं. याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. आपलं दारिद्रय कुठे तरी संपणार या आशेवर असणाऱ्या आई-वडिलांना अचानक मोठा धक्का देऊन सूरजने या जगाचा निरोप घेतला. त्याचे स्वप्न होतं देशासाठी फौजी होण्याचं. दररोज सराव करण्यासाठी सकाळी पहाटे लवकर उठून जायचा. आजही तसाच आईला मी जातो ग असे सांगून घरातून बाहेर पडला तो परतलाच नाही. सुरजच्या जाण्याने त्याच्या कुंटुंबावर मोठा आघात झाला आहे. ज्यांच्याकडे पाहून काबाड कष्टातून संसार करणाऱ्या त्याच्या आई वडिलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे . संपूर्ण गावाला लळा लावणारा, सतत आनंदी हसतमुख चेहरा, मित्रपरिवारात रमणारा . हरहुन्नरी सुरजच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा आली आहे.तो आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता, त्याला नववीत शिकणारी एक बहीण आहे.

error: Content is protected !!