गारगोटी /आनंद चव्हाण
छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जातांना पाटगाव येथील मौनी महाराजांचा आशिर्वाद घेऊन पुढे मार्गस्थ झाले होते. या मोहिमेत त्यांना प्रचंड यश मिळाले होते. अशा ऐतिहासीक दक्षिण दिग्विजय मोहिमेची माहिती राज्यभर पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले. ते पाटगाव येथे दक्षिण दिग्विजय यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

संभाजीराजे पुढे बोलतांना म्हणाले, दक्षिण दिग्विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटगाव येथे येऊन स्वहस्ते मौनी महाराजांच्या मंदिराची पायाभरणी केली. वेदोक्त प्रकरणानंतर जगातील सर्व क्षत्रीयांचे गुरूस्थान निर्माण करण्याची प्रेरणा राजर्षी शाहू महराजांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयामुळे मिळाली. पाटगावला शिव-शाहूंच्या विचाराचा मोठा ऐतिहासीक वारसा लाभलेला आहे. पाटगाव हे सामाजीक क्रांतीचे केंद्र असुन या परिसराचे ऐतिहासीक महत्व विचारात घेता पाटगावचा पर्यटनदृष्ट्या विकास साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी दक्षिण दिग्विजय यात्रेचा शुभारंभ खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
सचिन भांदीगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात क्षात्र जगदगुरु पिठाच्या इतिहासाची माहिती देऊन राजर्षी शाहू महाराजांनी पिठास दिलेली सनद वाचन करून पिठाच्या शिष्य परंपरेची ओळख करून दिली. तसेच युवकांनी इतिहासाच्या संवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, युवक नेते डॉ. नवज्योत देसाई, प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुगडे, भुदरगड सायकलीष्टचे अध्यक्ष सुशांत माळवी, सरपंच संदेश भोपळे, प्रकाश वास्कर, भुदरगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद भोईटे, रोहित इंदूलकर, प्रकाश वास्कर, संग्राम पोफळे, शशिकांत पाटील, सुशांत मगदुम, रोहित तांबेकर, स्वरूप पिळणकर, अमोल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन सागर पाटील यांनी केले तर आभार विश्वनाथ कुंभार यांनी मानले.