हातकणंगले / वार्ताहर
तीस टक्के व्याज दराने कर्ज देऊन महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी फसविले आहे .अशा कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या महिलांची मायक्रो फायनान्सची कर्जे माफ करण्यात यावी . या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकरीता आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला .

कुंभोज फाटा येथुन मोर्चास प्रारंभ करण्यात झाला . हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या . यावेळी मायक्रो फायनान्स कंपन्यांची महिलांची कर्जे माफ झालीच पाहिजेत . हप्त्यासाठी महिलांच्या पाठी तगादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या एजंटांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजेत . निरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांची कर्जे माफ करता मग आमची का नाही?असा सवाल करीत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येऊन मोर्चा धडकला . यावेळी महिला व कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमक घोषणांनी तहसीलदार कार्यालयाचा परिसर दणाणून गेला . यावेळी बंडखोर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली . यावेळी तहसीलदार प्रदिप उबाळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले .
यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी जबरदस्तीने हप्ते वसूली करू नये . असे आदेश पुणे विभागाचे आयुक्त सौरभ राव यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून जबरदस्तीने वसुली कोण करणार नाही . मात्र तसे होत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळवा असे सांगितले .
यावेळी मोर्चा समोर बोलताना बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की , कोरोनाच्या या काळात सर्वसामान्य माणसाचे जगणे असह्य झाले आहे . त्यामुळे जगायचं कसं हा प्रश्न समोर असताना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गोरगरीब महिलांच्या पाठी तगादा लावला आहे . चोवीस ते तीस टक्के व्याजदराने घरात घुसून हप्ते वसुली करून महिलांना त्रास दिला जात आहे . या त्रासामुळे गेल्या दहा वर्षांत अनेक महिलांनी आत्महत्या केल्या आहेत . त्यामुळे कोरोनाच्या या परिस्थितीत महिलांचे हे कर्ज सरकारने माफ करावे व मुजोर एजंटांवर कारवाई करावी . यांसह अन्य मागण्यांकरिता हा एल्गार पुकारला आहे असे आवळे म्हणाले . यावेळी बंडखोर सेनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या,जबरदस्तीने कर्ज वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या एजंटांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत . शेतकरी आणि उद्योजकांप्रमाणेच महिला बचतगटांचेही कर्जे माफ करावीत . कोरोनाच्या काळात वाहनधारक कर्जाचे हप्ते भरू शकत नाहीत . अशी वाहनधारकांची चारचाकी,
दोनचाकी वाहनं ओढून नेण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यात यावी .वैयक्तिक कर्जे असणाऱ्या कर्जदारांना शिवीगाळ धमकी देऊन वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांच्या एजंटांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत . महिलांच्या कडून पैसे भरून घेऊन देखील विमा पावत्या न देणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा . कर्ज घेतलेल्या दोघांपैकी एक म्हणजे पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास संपूर्ण कर्ज माफ करण्याची तरतूद असताना देखील कर्ज माफ न करता बेकायदेशीररीत्या कर्ज वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत . मायक्रो फायनान्स कंपन्यांची चौकशी होऊन बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी . अठरा ते तीस टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणाऱ्या या मायक्रो फायनान्स कंपन्यांची नोंदणी कशी व कोणी केली?थोडक्यात यांना खाजगी सावकारकी करण्याची लायसन्स कोणी दिले? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

मोर्चात महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.शिवालीताई आवळे, अस्मिता आवळे, पूनम आवळे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विकास अवघडे, सांगली जिल्हा अध्यक्ष निलेश मोहिते, युवक जिल्हा अध्यक्ष अभिषेक भंडारे, हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे, मिरज तालुका अध्यक्ष सुनिल पांढरे, हातकणंगले तालुका महिला आघाडी अध्यक्षा दिपाली अवघडे, उपाध्यक्षा संगीता पोवार, पेठवडगाव शहर अध्यक्षा वैशालीताई दैव, सुप्रिया बनसोडे, सुमन तोरस्कर, शोभा पाटील, छाया जाधव, रेणुका वड्ड, राजश्री धनवडे, लक्ष्मी सावंत, नीलम अवघडे, अंजुम जमादार, शारदा भाट, पद्मा वड्ड,आनंदी अवघडे, वैशाली कांबळे, दिपाली पोवार, अर्चना पोवार, माया कांबळे, वडगाव शहर अध्यक्ष राजेंद्र लोंढे, विशाल लोंढे, संपत पोवार, मोहीत वारे, शिवराज आवळे, हर्षवर्धन आवळे, समता आवळे, शामराव अवघडे, सूर्यकांत हजारे, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या, यावेळी महिलांची लांबच्या लांब रांग लागलेली होती, यावेळी हातकणंगले पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.