रुकडी / प्रतिनिधी

हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावचे सुपुत्र इस्माईल बाबालाल पेंढारी यांची विशाखापट्टणम येथे अँटी करप्शन,केंद्रीय अन्वेषण ब्यूरोच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षक पदी बढती झाली आहे . त्यामुळे रुकडी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सध्या ते केंद्रीय अन्वेषण ब्यूरो स्पेशल युनिट मुंबई येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून सन २०१३ पासून कार्यरत आहेत.
इस्माईल पेंढारी यांचे प्राथमिक शिक्षण रुकडी (ता. हातकणंगले) येथील कुमार विद्या मंदिर या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर कोल्हापूर येथील मेन राजाराम हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण व नाईट कॉलेज येथे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आयटीआय शिक्षण पूर्ण करुन कोल्हापूर येथील साई हायस्कूल येथे टेक्नीकल विभाग येथे सात वर्षे शिक्षक म्हणून कार्य केले. १९९३ मध्ये त्यांनी ‘स्टाफ सिलेक्शन’ या स्पर्धा परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. दिल्ली येथे प्रशिक्षण पूर्ण करून ते अहमदाबाद येथे केंद्रीय अन्वेषन ब्युरो पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. या दरम्यान त्यांना पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली. यानंतर सन २०१०मध्ये दिल्ली येथे पोलीस उपअधिक्षक म्हणून बढती मिळाली. यावेळी त्यांची तेलगी स्टॅम्प घोटाळा या महत्त्वाच्या केस प्रकरणात अधिक तपासासाठी नियुक्ती करण्यात आली होती. अॅन्टीकरप्शन मध्ये कार्यरत असताना तेलगीसह अनेक महत्वाच्या तपासकार्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.
बंगल्याचे नाव अन्वेषण: ज्या क्षेत्रात आपण काम करतो . त्याची आठवण व आपल्या कार्याची पोहोच पावती म्हणून त्यांनी रुकडी येथील बंगल्याला ‘अन्वेषण’ असे नाव दिले आहे.