कोल्हापूर/ प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, कोल्हापूर यांच्यावतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मित योजनेअंतर्गत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन (ऑनलाईन) संजय घोडावत पॉलीटेक्नीकमध्ये करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा.अजय कोंगे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा.अजय कोंगे यांनी विविध क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी प्रभावी प्रकल्प अहवाल सादर केलेल्या नवउद्योजकांना ५ ते ५० लाख कर्ज मंजूर झालेल्या नवउद्योजकांना उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शन लाभले आहे अशी माहिती दिली.
प्राचार्य विराट गिरी यांनी नवउद्योजकांना तांत्रिक मार्गदर्शन करीत भावी आयुष्यात या प्रशिक्षणाचा कसा वापर करून आपला व्यवसाय नावारूपाला कसा आणता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. विश्वस्त विनायक भोसले यांनी नवउद्योजकांनी व्यवसाय सुरु करताना कोणती काळजी घ्यायची तसेच आपल्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यशाला कोणताही शॉर्टकट नाही, जिद्द, मेहनत व चिकाटी तसेच कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता खंभीरपणे येणाऱ्या संकटाना सामोरे जाणे गरजेचे आहे हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणावरून स्पष्ट केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास तांत्रिक साहाय्य कॉम्प्युटर इंजिनीरिंग विभागाचे लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अजय कोंगे व आभार प्रदर्शन प्रा.सागर चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री.संजयजी घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या