वारणानगर/ प्रतिनिधी
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयत “भू-माहिती-तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन” (जिओ इन्फॉर्मेटिक्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये देश-विदेशातील चारशेहून अधिक संशोधक प्राध्यापक, अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर यांनी वेबिनार साठी शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम यांनी भू माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने मानवाला भेडसावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. वेबिनार चे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी, “वेबिनारच्या माध्यमातून देशाच्या विकासासाठी भू- माहिती-तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापनातून काही मार्गदर्शक सूचना, तत्त्वे, नमुने, प्रकल्प तयार करून वारंवार येणाऱ्या आपत्ती वरती कायमस्वरूपी उपचाराची गरज असून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.”

शिवाजी विद्यापीठातील भूगोल शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. संभाजी शिंदे यांनी बीजभाषणात “भू माहिती तंत्रज्ञानाचा वेगवेगळ्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी असल्याचे मत व्यक्त केले. सेंट्रल युनिव्हर्सिटी,तिरुवरुर- तामिळनाडू येथील भू- माहिती तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापनातील संशोधक अभ्यासक डाॅ. बालसुब्रमण्यम के. यांनी प्रथम सत्रामध्ये “भू माहिती तंत्रज्ञानातील मूलभूत संकल्पना, त्यांचा विकास आणि उपयोजनांचा आधुनिक पद्धतीने अभ्यास होण्याची गरज असल्याचे सांगितले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे. जंगल, शेती ,पडिक जमीनीच्या अभ्यासा बरोबरच भविष्यात तापमान वाढ, दरडी कोसळणे, भूसखलन, बर्फ वितळणे, दुष्काळ या समस्यांचा सुपीक जमिनी वरती ही विपरित परिणाम होणार असून मानवाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, त्याच्यासाठी अभ्यासपूर्वक नियोजनाची गरज आहे. यासंदर्भातील त्यांनी काही प्रात्यक्षिकेही सादर केली.
द्वितीय सत्रामध्ये शिवाजी विद्यापीठातील संशोधक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी भू माहिती तंत्रज्ञान आणि महापूर व्यवस्थापन व नियोजन या विषयी शिवाजी विद्यापीठ भूगोल विभागाने केलेल्या उल्लेखनीय कार्याचे सादरीकरण केले.
वेबिनारच्या तृतीय सत्र मध्ये अभिजित पाटील यांनी लँड स्लाईड मॅनेजमेंट या विषयी भ माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो हे सांगून पश्चिम घाटातील दरडी कोसळण्याची उदाहरणे, भविष्यातील संभाव्य दरडी कोसळण्याचे धोके या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे स्वागत डॉ. एस. एस. खोत यांनी तर प्रास्ताविक डॉ.पी.एस. राऊत यांनी केले. प्रा.व्ही. जी सावंत व डॉ. संतोष जांभळे यांनी साधन व्यक्तींचा परिचय करून दिला. वेबिनार चे सूत्रसंचालन डाॅ. आर. बी. पाटील यांनी केले तर आभार प्रा. नितीन कळंत्रे यांनी मांडले. वेबिनारच्यि डिजिटल उद्घाटन प्रसंगी डॉ. सुरेखा शहापुरे, डॉ. एस. एस. जाधव, डॉ. डी. आर. धेडे, डॉ. बी. के. वानोळे, प्रा. उमेश जांभोरे उपस्थित होते.