गारगोटी /आनंद चव्हाण
क्षत्रिय जगद्गुरू पीठ पाटगावचे शिव-शाहूंचे विचार रुजविण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केले. ते शतक महोत्सवी संत मौनी महाराज मठाच्या ऐतिहासिक वास्तूंच्या पुनर्जीवित उपक्रमांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमास खासदार संभाजीराजे,विजयसिंह बेनाडीकर व संजयदादा बेनाडीकर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज यांनी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने बहुजन समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या पुरोणोक्त वेदांना विरोध करण्यासाठी देशातील पहिले क्षत्रिय जगद्गुरू पीठ पाटगाव या पुण्यभूमीत स्थापन केले. छत्रपती व बेनाडीकर कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे असून पिठाच्या लोकसहभागातून इमारतींच्या पुनर्जीवित उपक्रमासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे असे सांगितले.

यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शहाजीराजे यांचा राज्यभिषेक क्षात्र जगद्गुरू यांच्या कडून करण्यात आला होता. यातून संत मौनी महाराज पिठाच्या क्षात्र जगद्गुरुंच्या विषयी असणारे महत्व सिद्ध होत असून या शतक महोत्सवात नियोजित सर्व कार्यास लोकसहभागा सोबतच सर्वोत्तोपरी मदत करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात क्षात्र जगद्गुरू पीठाचे संजयदादा बेनाडीकर यांनी शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती विशद केली. यावेळी श्रीमंत क्षात्र जगद्गुरू मौनीमहाराज संस्थान पिठाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन व शस्त्र संग्राहक समाधान सोनाळकर यांच्या शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . सूरज ढोली व सहकाऱ्यांच्या मर्दानी खेळांचे व डॉ.आझाद नाईकवडे यांच्या पोवाड्यांचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमास व्यासपीठावर महेंद्रसिंह बेनाडीकर, हर्षल बेनाडीकर, शिवजीत बेनाडीकर,अश्विन बेनाडीकर, पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, माजी सभापती धनाजीराव देसाई, माजी उपसभापती, सत्यजित जाधव,माजी जि.प. सदस्य राहुल देसाई, प्रा.अर्जुन कुंभार, डॉ. रविकुमार जाधव, शिल्पकार एम. डी. रावण, डॉ.सुभाष देसाई,गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे , साहित्यिक डी. के. मोरसे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते .आभार मनजीत बेनाडीकर यांनी मानले.