‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत चुकीची माहिती दाखवून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी निर्मात्यांवर कारवाई करा- हिंदू संघटनांची ,भक्तांसह पुजाऱ्यांची मागणी

कोल्हापूर / प्रतिनिधी
       श्री. जोतिबा देवस्थान हे कोट्यवधी हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री. जोतिबा देवस्थानवर आधारित ‘दख्खनचा राजा जोतिबा’ नावाने एक मालिका नुकतीच सुरू झाली आहे. मालिकेच्या प्रक्षेपणापूर्वी ‘पुजार्‍यांकडून योग्य माहिती घेतली जाईल, चुकीची माहिती दिली जाणार नाही’, असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी दिला होता. प्रत्यक्षात 23 ऑक्टोबरपासून ‘स्टार प्रवाह’ या मराठी वाहिनीवर चालू झालेल्या या मालिकेत अनेक विपर्यास करणारे प्रसंग दाखवून अत्यंत खोटी माहिती प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेमुळे अनेक भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. आणि भक्तांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

     त्यामुळे ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत चुकीची माहिती दाखवून भक्तांच्या भावना दुखावल्याविषयी ‘कोठारे व्हिजन प्रा. लि.’ वर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती, जोतिबा देवस्थान येथील पुजारी, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने 12 नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी हे निवेदन स्वीकारले. मालिकेत अशा प्रकारे दाखवण्यात येणारा कोणत्याही प्रकारचा खोटा इतिहास आम्ही सहन करणार नाही, असा इशारा या प्रसंगी देण्यात आली.
     मालिकेतील पुढील प्रत्येक भाग हे धार्मिक, ऐतिहासिक दस्तएैवज यांचा अभ्यास करूनच दाखवण्यात येतील, अशी श्री. महेश कोठारे यांनी लेखी हमी दिल्यावरच पुढील भागांचे प्रक्षेपण करण्यास अनुमती देण्यात यावी, तोपर्यंत मालिकेवर बंदी आणावी, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली.
    यावेळी हिंदु महासभा प्रांत उपाध्यक्ष श्री. नंदकुमार घोरपडे, किरण दुसे, हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे, शिरोली येथील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. सतीश पाटील, शिवसेना कामगार सेना जिल्हाध्यक्ष श्री. राजू सांगावकर, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. शशी बिडकर, शिवसेना करवीर तालुका प्रमुख श्री. राजू यादव, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष श्री. किशोर घाटगे, ज्योतिर्लींग पुरोहित चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रणजित चौगुले, जोतिबा देवस्थान पुजारी श्री. शिवदत्त मधुकर ठाकरे यांसह जोतिबा देवस्थान येथील भाविक आणि पुजारी सर्वश्री अक्षय शिंगे, प्रणय सांगले, अमन भोरे, विजय गेंडे, प्रणय सातार्डेकर, अभिजित चौगुले. रोहित कापसे, विश्‍वनाथ सांगले, स्वप्नील दादर्णे, सुनिल गेंडे, हिम्मत दादर्णे, सचिन शिंगे, अजित चौगुले, प्रकाश दादर्णे, विजय बुणे, सनी हाळगे, प्रवीण झुगर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे उपस्थित होते.

      ही मालिका ‘केदार विजय’ या ग्रंथावर आधारित असेल, असे सांगण्यात आले होते . प्रत्यक्षात पहिल्या भागापासून तसे दिसून येत नाही. कथेचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असून ‘यमाई’, ‘अंबाबाई’, ‘चोपडाई’ यांच्या व्यक्तीरेखा लेखकाला समजल्या आहेत का ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. रत्नासुराला अंबाबाईने कधी वरदान दिले ? ‘वाडी रत्नागिरी’ या डोंगराचे प्राचीन नाव ‘मैनाकगिरी’ होते, याचा विसर लेखकाला पडलेला आहे. या मालिकेत श्री. जोतिबा देवाची भाषा ग्रामीण पद्धतीची दाखवली आहे. आणि राक्षसांची भाषा शुद्ध दाखवली आहे. प्रत्यक्षात जोतिबा देवाने विद्याभ्यास केला होता. त्यामुळे देवाची भाषा शुद्ध हवी होती. देवाधिदेव दख्खनचा राजा अशी ज्यांची महती आहे, त्यांच्यासाठी मालिकेत वापरली जाणारी भाषा योग्य नसून ती देवांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या चुकीच्या गोष्टी मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत, त्याविषयी महेश कोठारे आणि ‘स्टार प्रवाह’ वाहिनी यांनी भाविकांची जाहीर क्षमा मागावी. यापुढे कोणत्याही देवता किंवा ऐतिहासिक विषयांवर मालिका बनवतांना त्यांतील संदर्भ अन् इतिहास हा योग्य आहे काय, याची पडताळणी केल्याशिवाय अशा मालिकांना मान्यता मिळू नये, यासाठी यंत्रणा उभी करावी, अशीही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

error: Content is protected !!