स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई, घरफोडी व चोरी उघडकीस , तब्बल बारा लाखाचा मुद्देमाल जप्त ;

कोल्हापुर / प्रतिनिधी

कोल्हापुर / प्रतिनिधी
    अकरा महिन्यापुर्वी घरफोडी व चोरी केलेल्या दोन सराईत चोरट्यांना कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हातकणंगले येथे मोठ्या शिताफीने पकडले. आरोपींकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल 12 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हर्षवर्धन सुरेश पाटील (वय वर्ष -२४) तेजस तानाजी पाटील (वय वर्ष -२२ रा. दोघेही नेज शिवपुरी ता . हातकणंगले जि.कोल्हापूर ) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नांवे आहेत .ही कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे ,अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तानाजी सावंत , सपोनि. सत्यराज घुले , संतोष पवार , सहा . फौजदार चद्रकांत ननवरे , संजय पडवळ , सोमराज पाटील , रणजीत पाटील , रविंद्र कांबळे ,संतोष पाटील , नामदेव यादव , रणजित कांबळे , चालक रफिक आवळकर , अनिल जाधव , सायबर पोलीस ठाणेचे अजय सावंत , सचिन बेंडखळे यांनी केली .
     याबाबत अधिक माहिती अशी की ,नेज शिवपुरी (ता . हातकणंगले ) येथील आरोपी हर्षवर्धन पाटील व तेजस पाटील यांनी अकरा महिन्यापूर्वी बाहुबली येथे रात्री घरफोडी केली होती. व आळते ( ता.हातकणंगले ) येथून बोअरची सबमर्सिबल मोटर चोरी केली होती. या गुन्ह्याचा शोध घेत असताना तपासात या दोन संशयित आरोपीची नांवे निष्पन्न झाली होती.आरोपी गुन्ह्यातील दागिने इचलकरंजी येथे विकण्यासाठी जाणार असल्याची माहिती समजल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना हातकणंगले येथील इचलकरंजी फाट्याला पकडले.
    यावेळी आरोपीकडून सोन्याच्या पाटल्या , नेकलेस , चेन , अंगठी , कानवेल , टॉप्स , रिंगा , लहान मुलांचे दागिने असे एकूण दोनशे पंधरा ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचा कलश , नारळ , पाने , कमरपट्टा असा एकूण सहाशे आठ ग्रॅम चांदी, दोन मोबाईल हॅन्डसेट तसेच सबमर्सिबल मोटर पंप 200 फूट वायर , नायलॉन दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला . पुढील तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून वारंवार गुन्हे उघडकीस येत असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. 

error: Content is protected !!