वाचनामुळे माणूस सुसंस्कृत घडू शकतो-डॉ . चिकुर्डेकर ; वारणा महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संपन्न …..

वारणानगर / प्रतिनिधी
   येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. आर. बी. पाटील, प्रा. व्ही.जी. सावंत, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, डॉ. एस. एस. खोत, डॉ. एस एस. जाधव, प्रा एस.एस. लाड, प्रा.जे.एस. शेटे, सहकारी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय मध्ये आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त उत्कृष्ट वाचक विद्यार्थिनी तेजस्विनी पाटील हिला पुस्तक भेट देऊन गौरव करताना प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत डॉ. एस.एस. खोत, डॉ.एस एस जाधव, अमृता बुगले, नेत्रांजली कुंभार.

     यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ . अब्दुल कलाम, भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर, मदर तेरेसा आणि सर्जक पालवी यांच्या जीवनावरील उताऱ्यांचे वाचन महाविद्यालयातील विद्यार्थिनी अमृता बुगले, तेजस्विनी पाटील, नेत्रांजली कुंभार आणि सौरभ गायकवाड यांनी केले. वाचक विद्यार्थ्यांना ‘सर्जक पालवी शोध एका बाललेखिकेचा’, हे पुस्तक भेट देऊन गौरव करण्यात आला.
    अध्यक्षीय समारोपात प्रभारी प्राचार्य डॉ प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की, वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून तरुण पिढीने पुस्तकाबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सऍप च्या रुपाने मिळणारे नववाचन ज्ञान ही आत्मसात करावे. वाचनाने माणूस फक्त वाचतच नाही तर तो घडतो, शिकतो, आचार, विचार, संस्कार, संयम, संस्कृती, समाज, धर्म, अर्थकारण, शिक्षण, राजकारण याच्या पलीकडे जाऊन एक सुसंस्कृत माणूस घडू शकतो असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
     दरम्यान एच. एस. व्ही.सी. विभागाच्या वतीने स्वपरिचय सादरीकरण व ‘अब्दुल कलाम यांचे मला आवडलेले पाच विचार’ या विषयावर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा ऑनलाइन स्वरूपाची असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने स्वतःचे दोन मिनिटाचे व्हिडिओ बनवून संयोजक प्रा.वर्षा राजपूत यांच्याकडे पाठविले आहेत.
     स्वागत प्रास्ताविक संयोजक डॉ. एस. एस. जाधव यांनी केले. तर आभार डॉ. बी.के. वानोळे यांनी मानले.

error: Content is protected !!