कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी ६० वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रांत एक आगळावेगळा ठसा उमटविला. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक तसेच विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले. याचे अनुकरण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्याध्यापक संघांनी केले. वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी डी.बी.पाटील सरांची २९ ऑक्टोबर २०१९ ला प्राणज्योत मालवली . त्यांच्या महनीय कार्याचा वसा व वारसा जपण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डी.बी.पाटील शैक्षणिक विचारमंचची स्थापना करण्यात आली. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांना शिक्षणतज्ज्ञ डी.बी. पाटील पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय विचारमंचने घेतला. त्यानुसार एकूण ७२ मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांची निवड करण्यात आली.या सर्वांचा सत्कार आज शनिवार दि.१६/०१/२०२१ रोजी न्यू कॉलेज, कोल्हापूरच्या प्रांगणात दु.२.३० वाजता शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड varshatai gayakvad यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या समारंभाचे अध्यक्षपद ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ हे भूषविणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री ना.सतेज ऊर्फ बंटी डी.पाटील व आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्र विधानपरिषदेचे पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार जयंत आसगांवकर व पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार अरूण लाड यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार केला जाणार आहे. या समारंभास जिल्ह्याचे खासदार, आमदार व शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेस प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींगचे चेअरमन आर. डी. पाटील, अध्यक्ष बी.जी.बोराडे , शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस .डी.लाड, प्रा.सी एम गायकवाड, आर. वाय .पाटील, उदय पाटील, खंडेराव जगदाळे, रंगराव तोरस्कर, जयसिंग पवार ,संदीप पाटील, एस.के.पाटील , सुधाकर निर्मळे, भाऊसाहेब सकट , बी .एस.कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते