अवजड वाहनांना पिवळा रंग का देतात? बघूया त्यामागचे विज्ञान

    आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी आहेत त्यामागे काहीतरी विशिष्ट कारण असते. पण दररोजच्या जीवनात आपण त्याला फार महत्व न देता त्यावर विचार करत नाही. आता हेच बघा, तुम्ही प्रवास करता तेव्हा या एक प्रकारची वाहनं तुम्ही पाहता. जशी अवजड वाहनं मुखत्वे पिवळा रंगात असतात. जसे जेसीबी, खाणकामासाठी वापरले जाणारे मोठ्या आकाराचे ट्रक, डांबरीकरणासाठी वापरले जाणारे रोलर अशी सार्वजनिक बांधकामासाठीची वाहने पिवळ्या रंगाचीच असतात. मुळात आपण सामान्यपणे खोदकाम करणाऱ्या वाहनांना जेसीबी (अर्थमूव्हर्स) असं संबोधतो. खरं जेसीबी हा वाहनांचा प्रकार नसून खोदकाम करणाऱ्या वाहनांची निर्मिती करणारी एक कंपनी आहे. असो, तो विषय वेगळा पण तुम्हाला प्रश्न पडलाय का या वाहनांना पिवळा रंगच का वापरला जातो?

    मुख्य कारण म्हणजे पिवळा रंग हा अधिक लक्ष वेधून घेतो. म्हणजे इतर रंगापेक्षा पिवळा रंग ठळकपणे दिसून येतो. या अश्या अवजड वाहनांद्वारे कोणताही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून या वाहनांना पिवळा रंग दिला जातो. कोणत्याही कोनातून पाहिल्यास हा रंग अधिक सहजपणे दिसतो. तसंच पिवळा रंग हा कमी प्रकाशात तसेच धुकं, मुसळधार पाऊस आणि अंधारात ही दुरवरून स्पष्ट दिसतो.

    वैज्ञानिकांना असे आढळले आहे की पिवळा रंग लाल रंगापेक्षा 1.24 पट जास्त दिसू शकतो. हा सारा रंगांचा आणि आपल्या डोळ्यांचा खेळ आहे. काही रंग आपल्या डोळयांना आल्हाददायक तर काही रखरखीत वाटतात. जवळून काही रंग स्पष्ट दिसतात पण तेवढ्या लांबून जाणवत नाहीत.

    याच्यामागचं असणारे कारण आहे त्या रंगाची तरंगलांबी (wave length). तरंगलांबीचा विचार केल्यास विबग्योर VIBGYOR (इंद्रधनुषी सात रंग) पट्ट्यांमध्ये पिवळ्याची रंगाची तरंगलांबी ५७० नॅनोमीटर इतकी आहे.VIBGYOR मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना तरंगलांबी वाढत जाते. तरंगलांबी अधिक असणारे रंग लांबूनही अधिक स्पष्टपणे दिसतात. म्हणजेच निळ्या (B) रंगापेक्षा पिवळा (Y) आणि पिवळ्यापेक्षा लाला (R) अधिक स्पष्टपणे दिसतो. केशरी रंगाची तरंगलांबी ५९० नॅनोमीटर इतकी आहे तर लाल रंगाची ६२० नॅनोमीटर इतकी आहे.

    आता उदाहरण बघा, रस्त्यावर दूरवर जे होर्डिंग लावलेले दिसतात. त्यात लिहिलेल्या मजकूर वाक्य निळ्या रंगात आणि लाल रंगाचा उपयोग केला असेल तर जवळून तुम्हाला दोन्ही रंगातील वाक्यं सहज वाचता येतील. जर लांबून पाहिलेत तर निळा रंग वाचायला अवघड जातो तर लाल रंगातील अक्षर कोणत्याही अडथळ्यांविना सहज वाचू शकाल. याचे कारण लाल रंगाची तरंगलांबी ही निळ्या रंगाच्या तरंगलांबीपेक्षा जास्त आहे. थोडक्यात, जेवढी जास्त तरंगलांबी तेवढी जास्त दृश्यमानता. लाल रंगाच्या गाड्या खूप लांबून नजरेस पडतात. त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी येताना तिला इतर वाहन चालकांनी तातडीने रस्ता खाली करु देणे अपेक्षित असते. म्हणूनच अग्निशमन दलाच्या गाड्यांना लाल रंग दिला जातो.

     स्कूल बस आणि व्हॅन ही पिवळ्या रंगातच असतात ते याच कारणामुळे. शेवटी काय तर अवजड वाहने स्पष्टपणे दिसावित म्हणून ज्यादा तरंगलांबी असणारा रंग त्याच्यासाठी वापरणे सरकारच्या धोरणानुसार बंधनकारक आहे.

 

संग्रहित माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!