कोल्हापुरात नवरात्र उत्सव काळात वहातुकीत बदल , काही भागात वाहनांना प्रवेश बंदी ;पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे प्रसिध्दीपत्रक

कोल्हापूर :(जि.मा.का.)
     17 ते 25 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या कालावधीमध्ये महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत. श्री महालक्ष्मी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व त्या परिसरातील वाहतूक सुरळीत रहावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, नागरिक व भाविकांच्या सुरक्षतेसाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अधिकारान्वये नवरात्र उत्सव कालावधीत मोटार वाहतुकीचे नियमन करण्याच्या अनुषंगाने व कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्याकरीता दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांना खालीलप्रमाणे प्रवेश बंद करण्यात आले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
     सर्व प्रकारच्या वाहनांना महालक्ष्मी मंदिराकडे जाण्यास पूर्णवेळ प्रवेश बंदी करण्यात येत आहे. (अत्यावश्यक सेवेतील वाहने व पासधारक स्थानिक रहिवाशी खेरीज करुन)
1) छ. शिवाजी महाराज पुतळ्याकडून भवानी मंडपकडे जाणाऱ्या छ. शिवाजी महाराज पुतळा चौक (हायमास्ट) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
2) जोतिबा रोड येथून भवानी मंडपकडे येणाऱ्या वाहनांना भुषण स्वीट मार्ट व प्रकाश फार्मसी या दोन्ही ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
3) गुजरी रोड ते गाडगे महाराज पुतळ्याकडे खर्डेकर बोळ जाणाऱ्या वाहनांना गुजरी रोडवर खर्डेकर बोळ या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
4) गुजरी रोड ते घाटी दरवाजा जाणाऱ्या वाहनांना गुजरी रोडवर घाटी दरवाजा या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
5) उर्मिला टॉकीज ते महालक्ष्मी चौक महाद्वार रोड जाणाऱ्या वाहनांना कपिलतीर्थ रिक्षा स्टॉप या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
6) बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी जाणाऱ्या वाहनांना बिनखांबी गणेश मंदिर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
7) गुरुमहाराज वाडा ते भवानी मंडप जाणाऱ्या वाहनांना गुरु महाराज वाडा या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
8) मिरजकर तिकटी ते भवानी मंडप जाणाऱ्या वाहनांना महिला बँक व एमएलजी कॉर्नर या ठिकाणी प्रवेश बंद करण्यात येत आहे.
संबंधित ठिकाणी येणाऱ्या दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
आवश्यक वेळी परिस्थितीनुसार योग्य ते निर्देश वेळोवेळी देण्यात येतील. वाहनधारक ,नागरिकांनी पोलीसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असेही नमुद करण्यात आले आहे.

error: Content is protected !!