विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ – सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय)

       मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावर अद्यापही मोठ्या संख्येने प्रलंबित आहेत. शासन स्तरावरून महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज स्विकारण्यास 30 एप्रिल पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
       संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य यांनी महाविद्यालयातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या अर्जांबाबत स्विकृतीची कार्यवाही तात्काळ करावी व संस्थेतील पात्र असणारा एकही मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी. अशा विद्यार्थ्यांची परिपूर्ण स्वरूपातील अर्ज छाननी केलेले अर्ज महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईनरित्या सादर करावयाचे आहेत. महाडीबीटी ऑनलाईन प्रणालीमधुन महाविद्यालयास देय असणारे शिक्षण शुल्क त्यांच्या खात्यावर अलहिदा जमा केले जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी आकारणी करू नये व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
       महाविद्यालयाकडून जर विहीत कालावधीत अर्जांबाबत कार्यवाही न झाल्याने विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले तर अशा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत महाविद्यालय जबाबदार राहील. या कालावधीत महाविद्यालयांनी तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.

error: Content is protected !!