आपल्या भारत देशाच्या सहिष्णू वृत्तीमुळे आपल्या देशावर दुर्दैवाने अनेक आक्रमणे झाली आणि आपल्याला बराच काळ पारतंत्र्यात राहावे लागले. समुद्रमार्गे अनेक सत्ता भारतावर हल्ले करत. त्यापैकी सर्वप्रथम आले ते म्हणजे पोर्तुगीज आणि सर्वात शेवटी गेले ते ही पोर्तुगीज. ही गोष्टच त्यांचा चिवट स्वभाव सांगण्यासाठी पुरेशी आहे. त्यांच्याशिवाय इंग्रज ,फ्रेंच ,सिद्धी अशा सत्ता भारतात येत होत्या. त्यांचा धोका ओळखून शिवरायांनी आरमाराची उभारणी केली. १४९८ साली वास्को-द-गामा ने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील सध्याच्या केरळ राज्यातील कालिकत बंदरात पाऊल टाकले. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले .आश्चर्याची गोष्ट १४९८ साली भारतात प्रवेश करणाऱ्या पोर्तुगीजांनी १५१० साले गोवा ताब्यात घेतला.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. १९६१ साली गोवा मुक्त करण्याचा मोठा प्रयत्न झाला. त्याआधी खूप तयारी करून गोव्यावर हल्ला केला. त्यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिक आपल्या जीवाची बाजी लावून, संसाराचा त्याग करून सामील झाले होते. सुदैवाने चाळीस तासाच्या लढाईनंतर गोवा मुक्त झाला. मध्यकाळात छत्रपती शिवरायांनी गोव्यावर प्रचंड वचक बसवला होता. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी तर जवळजवळ आपल्या पराक्रमाने गोवा मुक्त केला होता .परंतु मोगलांच्या अडचणीमुळे ऐनवेळी त्यांना परत फिरावे लागले संभाजी राजांचे जीवन ही खरंतर दुर्दैवाची कहाणी .जंजिरा व गोवा या मोहिमा यशस्वी होत्या तर इतिहासाला एक नवीन नवीन वळण मिळाले असते आणि संभाजीराजांच्या कारकिर्दीमध्ये मानाचे पान जोडलेली असते .
आपल्याला हा इतिहास माहिती असणे गरजेचे आहे कारण गोवा हा सांस्कृतिक दृष्ट्या आणि भौगोलिक दृष्ट्या कोकण आणि महाराष्ट्राचा भाग वाटतो. गोवा हे वेगळे राज्य आहे हे मनाला पटत नाही .आज आपण जीवाची मुंबई करायला जातो त्याच पद्धतीने मौजमजा करण्यासाठी गोव्याला जातो .त्याचे कारण पाश्चात्य पोर्तुगीजांची गोव्यावर पडलेली सावली आहे. ही एक प्रकारे आपली सांस्कृतिक गुलामी किंवा मानसिक पारतंत्र्यच आहे. गोवा मुक्ती दिनानिमित्त हा छोटासा आढावा. गोवा स्वतंत्र करण्यासाठी झुंजलेल्या ज्ञात-अज्ञात सर्व वीरांना मानाचा मुजरा.

