स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनाची खंबीर तयारी असायला हवी-पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते

वारणानगर/ प्रतिनिधी
      येथील श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय अंतर्गत विनय कोरे करिअर ॲकॅडमी मध्ये अल्पावधीत यश प्राप्त केले कवठेमहांकाळ – नागज येथील अमर मानसिंग मोहिते यांच्या अनुभव कथन आणि संवाद सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते. समन्वयक डॉ. ए. आर.भुसनर यांनी स्वागत प्रास्ताविक करून परिचय करून दिला.

वारणानगर येथील विनय कोरे करिअर ॲकॅडमी मध्ये आयोजित व्याख्यानमालेस नुतन पोलिस उपअधीक्षक अमर मोहिते (नागज-कवठेमंहाकाळ) यांचा सत्कार करताना प्र. प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर. सोबत समन्वयक डॉ.ए.आर.भुसनर व सहकारी प्राध्यापक.

      2018 मध्ये इंजिनिअरिंग पदवी प्राप्त केल्यानंतर उपशिक्षणाधिकारी आणि लगेचच पोलिस उपअधीक्षक पद प्राप्त केले. त्यांच्या यशाची गाथा वारणा परिसरातील विद्यार्थ्यांना कळावी आणि तरुणांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने संवाद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्याने चालणाऱ्या या उपक्रमात महाराष्ट्रातील गुणवंत आणि यशवंत यशस्वी अधिकाऱ्यांना बोलून त्यांचा सन्मान करून विद्यार्थ्यांच्या पर्यंत त्यांचे कार्यकर्तृत्व पोहोचवण्याचा सातत्याने या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे.
      यावेळी बोलताना अमर मोहिते यांनी सांगितले की, प्रतिकूल परिस्थितीत असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठीचा प्रवास खडतर होता. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनाची खंबीर तयारी असायला हवी. पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त करण्यासाठी कविमनाचा उपयोग झाल्याचे त्यांनी सांगितले. निवडक पुस्तकांचे वाचन आणि चिंतन, अभ्यासाचतील सातत्य, आत्मविश्वास, स्वतः नोट्स काढून अभ्यासाची पद्धती, ऑडिओ -व्हिडिओ च्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती यशाच्या शिखरावर घेऊन गेली. सातत्याने स्पर्धा वाढत असून एका परीक्षेत यश आले नाही तर दुसरा पर्याय ही स्पर्धक विद्यार्थ्यांनी तयार ठेवणे आवश्यक आहे.मनाला चटका लागल्या शिवाय ध्येय कळत नाही असेही ते म्हणाले.
       आजही आई – वडील मोलमजुरीला जात आहेत त्यांचं कष्ट हलकं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.
      अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर म्हणाले की,” परिस्थितीच माणसाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाते. मनावरती संयम, जीवन जगण्याचे नियम निश्चित करून, आत्मविश्वास, जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.”
      प्रा.अशोक चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. समारंभ संयोजन प्रा. संतोष कांबळे आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केले.

error: Content is protected !!