कशेडी घाटात अपघात, पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळली, चार पर्यटक जखमी

रत्नागिरी प्रतिनिधी

     मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात कोकणातून पुण्याच्या दिशेला निघालेल्या पर्यटकांची कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातामध्ये पुणे येथील चार पर्यटक जखमी झाले असून अपघाताची माहिती मिळताच कशेडी पोलिसांनी दीडशे फूट खोल दरीत उतरून मदतकार्य करत या जखमी पर्यटकांना बाहेर काढून पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. हा अपघात शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला.

   पुणे जिल्ह्यातून कोकणात पर्यटनासाठी आलेले पर्यटक हे आपल्या मारुती कारने आज पुण्याच्या दिशेने परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. कशेडी घाटातील पोलादपूरच्या बाजूला प्रतापगड दर्शन पॉईंट नजीक एका अवघड वळणावर कार चालकाला वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. ज्यावेळी हा अपघात घडला नेमके त्याचवेळी महाड येथील केबल नेटवर्कचा व्यवसाय करणारे रोशन बबन कदम हे देखील याच घाटातून प्रवास करत होते व त्यांच्या समोरच पर्यटकांची कार दरीत कोसळली.केबल व्यावसायिक यांनी क्षणाचाही विलंब न करता या घटनेची माहिती कशेडी येथील पोलिसांना दिली.

  यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडकर, पोलीस हेडकोन्स्टेबल समेल सुर्वे.धोपावकर, जाधव, पोलीस शिपाईचिकणे,शेलार,दुर्गावळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ महेश व सहदेव आणि पोलादपूरचे पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेऊन दीडशे फूट खोल दरीत उतरून मदतकार्य केले व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले .या अपघातामध्ये विशाल नंदू वरूते (वय 24),अजिंक्य नंदू वरूते (वय 28), तुषार नंदू वरूते (वय 20), गणेश पर्वते गाडे (वय 35) हे चार पर्यटक जखमी झाले. यातील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून एक गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कशेडी घाटात नेहमीच अपघात होत असतात. या घाटात जेव्हा कधी अपघात होतात त्यावेळी कशेडी पोलीस चौकीचे सर्वच पोलीस कर्मचारी हे देवदुताप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जातात. जर कशेडी घाटातील दरीमध्ये कोसळलेल्या अपघाताबद्दल महाड येथील केबल नेटवर्कचा व्यवसाय करणारे रोशन कदम यांनी हा अपघात घडताना पहिला नसता तर मात्र दीडशे फूट दरीत कोसळलेल्या या कारचा थांगपत्ता उद्या सकाळपर्यंत कोणालाच लागला नसता. रोशन कदम यांनी हा दुर्दैवी अपघात पाहिला आणि याची माहिती कशेडी पोलिसांना दिली व अपघातग्रस्तांना वेळीच मदत मिळण्यास शक्य झाले. कशेडी पोलिसांनी केलेल्या धाडसी मदतकार्यामुळे आज पुन्हा एकदा महामार्ग पोलिसांचे देवदुताचे रूप अपघातग्रस्तांना अनुभवायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!