क्रिकेटच्या मैदानात मृत्यू झालेल्या ‘अतुल’ने निवडणूक जिंकली, गावकऱ्यांना अश्रू अनावर

सांगली प्रतिनिधी

‘गड आला अन् सिंह गेला’, अशी प्रतिक्रिया अतुल पाटील यांच्या मित्र आणि कुटुंबाने व्यक्त करत अश्रूना वाट मोकळी करून दिली.

  ‘अरं अतुल जिंकला…’असं म्हणताच अवघ्या गावाला आणि मित्र परिवाराचा अश्रूचा बांध फुटला. कारण, दोन दिवसांपूर्वी सांगलीच्या (Sangali) आटपाडीमध्ये क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने (Heart attack) अतुल पाटील या तरुणाचा मृत्यू झाला होता. अतुल पाटील हे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला (Maharashtra Gram Panchayat election 2021) उभे होते. सोमवारी झालेल्या मतमोजणीत अतुल पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आणि मित्र परिवार आणि गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

    तासगाव तालुक्यातील ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीचा मनाला चटका लावून जाणारा निकाल लागला आहे. 17 जानेवारी रोजी अतुल पाटील (वय 35) यांचे क्रिकेट खेळत असताना ह्रदयविकाराच्या धक्काने निधन झाले होते. पण, ग्रामपंचायतीच्या निवडणूक अतुल पाटील यांनी 333 मतं घेऊन दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल पाटील ज्या पॅनलकडून उभे होते. त्या पॅनलने सुद्धा ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे ‘गड आला अन् सिंह गेला’, अशी प्रतिक्रिया अतुल पाटील यांच्या मित्र आणि कुटुंबाने व्यक्त करत अश्रूना वाट मोकळी करून दिली.

    सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. यावर्षी त्या आटपाडी येथे सुरू होत्या. तासगाव तालुका संघातून विकेट किपर म्हणून अतुल पाटील खेळत होते. 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास सामना सुरू असताना त्यांनी एक बॉल अडवला असता अचानक ते मैदानावरच कोसळले.
    अतुल पाटील मैदानावर कोसळल्यामुळे इतर खेळाडूंनी त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली होती.

     अतुल पाटील हे औषध विक्रेते होते. त्याचबरोबर ढवळी गावचे ते उपसरपंच होते. तसंच अतुल पाटील हे खासदार संजय पाटील समर्थक होते आणि ढवळी गावचे माजी उपसरपंच होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते उमेदवार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे ढवळी गावात दुखाचे वातावरण आहे. त्यातच अतुल पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा दणक्यात जिंकली आहे. त्यामुळे कुटुबांना अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!