पंचवीस एकर ऊसासह, दीड एकर केळीची बाग जळून खाक ;सत्तर लाखाचे नुकसान

शिरोली / प्रतिनिधी
     इलेक्ट्रिक ट्रांन्सफाॅर्मरमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत हालोंडी (ता. हातकणंगले ) येथील पंचवीस एकर ऊस व दीड एकर केळीची बाग जळून खाक झाली. या आगीमुळे शेतकऱ्यांचे सुमारे सत्तर लाख रुपये इतके नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास हालोंडी मौजे वडगाव या रस्त्यावरील निळकंठ , कागवाडे मळा येथे घडली.

    याबाबतची मिळालेली माहिती अशी की, हालोंडी येथील सुमारे वीस शेतकऱ्यांची मौजे वडगाव रोडलगत ऊसाची शेती आहे. येथील सर्वे नंबर १५७ निळकंठ – कागवाडे मळा येथे वीज वितरण कंपनीचा ट्रांन्सफाॅर्मर आहे. यामध्ये शॉर्टसर्किट होऊन त्याला आग लागली व आगीची झळ ऊसाच्या फडाला लागली. यामुळे येथील सुमारे २५ एकर ऊस व दीड एकर केळीची बाग जळून खाक झाली . या आगीमुळे येथील शेतकऱ्यांचे सुमारे सत्तर लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
   नुकसानीची भरपाई वीज वितरण कंपनीने द्यावी. अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार राजूबाबा आवळे यांचेकडे केली आहे. याबाबत आपण शासनाकडे पाठपुरावा करून. नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन आमदार आवळे यांनी शेतकऱ्यांना दिले. या घटनेचा पंचनामा हेरले मंडल अधिकारी बी.एल.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गावकामगार तलाठी, विज वितरण कर्मचारी व कोतवाल यांनी केला आहे.

error: Content is protected !!