‘धनगर आरक्षण’ गोलमेज परिषदेला भरभरून प्रतिसाद दिला . अगदी तसाच पाठिंबा धनगरवाड्यांच्या प्रश्नावर उभारत असलेल्या “नव्या लढाईलाही” द्यावा – संदीप कारंडे – संयोजक, धनगर आरक्षण गोलमेज परिषद

    बांधवांनो…, देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र या स्वातंत्र्याचा सुर्यप्रकाश आजदेखिल धनगरवाड्यांच्यावर पडला नाही. प्रगत आणि पुढारलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य धनगरवाड्यांना आजही पायाभूत सोई – सुविधांचा प्रश्नं भेडसावत आहे. म्हासुर्ली येथिल मधला धनगरवाडा या एकाच धनगरवाड्यावर गेल्या ३ महिन्यात केवळ रस्त्याअभावी तिघाजणांचा मृत्यू झाला आहे. आणि ही गोष्ट शासनं व प्रशासनाविरोधात चिड आणणारी आहे. विकासाच्या केवळ गप्पा मारणा-या राज्य आणि केंद्रसरकारसाठी हे अत्यंत लाजिरवाणे आहे.

   हाताला काम नाही, घरात वीज नाही, पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते, घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही, रोजगाराची साधनं नाहीत, मुलाबाळांसाठी चांगली शाळा नाही, शिक्षण अर्ध्यावर सोडून लहान वयातच गुरामागं डोंगरद-यात आणि जंगलात फिरणारी व बालपणं हरवलेली, भविष्यकाळ अंधारात असलेली चिमुरडी पोरं, एकवेळची घरातील चूल पेटावी म्हणून डोंगराळ आणि दुर्गमं भागात दिवसभरं लाकुडं फाटा गोळा करायचा आणि ती लाकडाची मोळी डोक्यावर ठेवून ६ ते ७ किलोमीटर चालत जावून जवळच्या शहरात विकायची. त्यातून मिळणा-या ३० ते ४० रुपयात घरखर्च चालवायचा. आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जायचं नाही कारण दवाखान्याचा खर्च परवड नाही. त्यामुळे अनेक दुखणी अंगावर काढणारी माणसं, बाग – बगीचा नाही, मॉल नाही, सिनेमाहॉलही नाही. हॉलीबॉल, फुटबॉल, खोखो – कबड्डी, हूतूतू, क्रिकेट आणि असे अनेक खेळ खेळण्यासाठी खेळाची मैदानं नाहीत, आठवड्यातून एकदा तासभर वीज येते. त्यामुळे घरात टि.व्ही, फ्रीज, कुलर, वाशिंग मशिनं असल्या कांही भानगडी नाहीत. रात्रीच्या अंधारात जर एखाद्याला सर्पदंश झाला किंवा एखादा वृद्द किंवा वृद्दा आजारी असेल आणि अचानक त्याला त्रास जाणवू लागला तर सर्व धनगरवाडा शोकाकूल होतो. आजू – बाजूच्या आया बाया आणि वृद्द मंडळी गोळा होतात. आणि कपाळाला हात लावतात…. आता काय करायचे ? हा प्रश्नं प्रत्येकाच्या चेह-यावर दिसू लागतो. कारण धनगरवाड्यावर कोणतेही चारचाकी वाहनं पोहचू शकत नाही. मग प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतो की, दिवस असता तर बरे झाले असते. किमान पायाखालचा रस्ता तरी दिसला असता…. विचार करा जर धो – धो पाऊस कोसळत असेल आणि रात्रीची वेळ असेल तर हे समाजबांधव काय करत असतील ??? कारण धनगरवाड्यांवर पावसाळ्यातील ४ महिने पाऊस अपवादानेच उघडतो.    

   एखाद्या गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागले, सर्पदंश झाला किंवा अचानक एखाद्याला त्रास जाणवू लागला तर त्याला बाजल्यावर झोपवायचे आणि जिवंतपणीच त्याला चौघांनी खांदा द्यायचा व डोंगरकपारीतून कंदीलाच्या उजेडात रस्ता काढत मुख्य रस्त्यापर्यंत आणायचे. अगदी ६ ते ७ किलोमीटरपर्यंतचे हे अंतर चालत असताना कांहीवेळा वाटेतच त्याचा जीव जातो. परिणामी त्याला पुन्हा परत न्यायचे आणि त्याच्यावर अंत्यविधी करायचे हेच आजपर्यंत या धनगरवाड्यावर चालत आले आहे. त्यामुळे आम्हाला प्रश्नं पडला आहे की, हे कुठवर चालायचे ?

  तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांची गाडी कधी इकडे पोहचू शकत नाही. कारण त्यांनाही तिथपर्यंत जायला रस्ता नाही. मग मंत्री आणि संत्री तर कसे येणार ? केवळ कागदावरच्या योजना आणि त्यामध्ये ढीगभर भ्रष्टाचार अशी सर्व नकारात्मक परिस्थिती व ‘ना’ चा पाढा ही या धनगरवाड्यांची करुणकहाणी आहे. रस्ते, वीज, पाणी, दळणवळण, मोबाईल नेटवर्क, इंटरनेट, संगणक, अंगणवाडी, बालवाडी, वाचनालय, ग्रंथालय, किराणा मालाचे दुकान, सलूनचे दुकान, बाजरपेठ, दुध संकलन केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, स्वागत कमान, बंदीस्त गटारी, स्मशानभूमी, पथदिवे, धोबीघाट, ग्रामपंचायत कार्यालय, शाळेच्या सुसज्ज खोल्या, यात्रा, जत्रा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, तालीम मंडळ, सार्वजनिक मंडळ, मंदीरे, सभागृहे, आरोग्याच्या सोई – सुविधा, पायाभूत सोई – सुविधा आणि अशा असंख्य गोष्टींपासून हे धनगरवाडे कोसो दूर आहेत. आणि या गोष्टी संबंधित धनगरवाड्यांवर तात्काळ उपल्बध होतील अशी कोणतीही व्यवस्था शासनं आणि प्रशासनाच्या ध्यानीमनी नाही.

   रस्ता नसल्यामुळे नुकताच म्हासुर्ली येथिल धनगरवाड्यावरील एका मातेचा तिच्या बाळासह मृत्यू झाला आहे. या –हदयद्रावक घटनेमुळे आज सर्वांचे मन ‘सुन्न’ झाले आहे. एकीकडे “प्रगल्भ आणि ताकदवान” भारत..…. या विषयावर विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे धनगरवाड्यावरील एका माऊलीची अशी जिवंत अवहेलना करायची… त्यामुळे आमचा देश ख-या अर्थाने मजबूत आणि सक्षम होत आहे का ? हा प्रश्न तुमच्यासारखाच माझ्यासमोरही उभा रहात आहे. रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळू शकल्याने, धनगरवाड्यावरील मातेचा तिच्या बाळासह मृत्यू ही घटना अनेक दैनिकांसह इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि पुन्हा एकदा धनगवाड्यांवरील विकासकामांच्या गप्पा मारणा-या लोकप्रतिनिधींचा शासन आणि प्रशासनाचा बुरखा टराटारा फाटला. मात्र जे या जगण्यातचं खऱ्या अर्थाने मरणयातना भोगत आहेत. त्या माझ्या धनगरवाड्यावरील, या बांधवांना जगण्याचा अधिकार आहे की नाही ? हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वच मानवतावादी कार्यकर्त्यांना आज भेडसावत आहे.

   या धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांचा विकास तर सोडाच, या समाजबांधवांच्या अस्तित्वालाही एका अर्थाने खीळ बसली आहे. त्यामुळे विकासाच्या अहोरात्र गप्पा मारणाऱ्या या प्रशासनाला, इथल्या राज्यकर्त्यांना माझा सवाल आहे की, हे नेमके कुठपर्यंत चालणार आहे ? की वर्षांनुवर्षे या माझ्या धनगरबांधवांची अशीच कुचेष्टा करणार आहात…..?

   ज्यावेळी संबंधित कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मी या धनगरवाड्यावर पोहोचलो, तेंव्हा सर्पदंशाने ठार झालेल्या त्या बालकाच्या कुटुंबासह त्या मातेच्या कुटुंबियांवर कोसळलेला दुःखाचा आणि संकाटांचा डोंगर पाहून माझे मन कळवळले. दोन्ही कुटुंबावर दुःखाची छाया अगदी ठळक झाली होती त्या छायेपुढे सर्वच पर्याय आणि शब्द अपूर्ण होते आणि आमच्याकडे मात्र सांत्वनाच्या चार शब्दापलीकडे कांहीही नव्हते. त्यांच्या जगण्याचा प्रश्न तसाच ‘आ’वासून उभा होता…आम्ही आमच्यापरिने यथाशक्ती मदत केली. मात्र हा अन्याय बघून शासन आणि प्रशासनाविरोधात “दंड थोपटून बंड” उभा करण्याची भावना यावेळी माझ्या रक्तात पेटून उठली….

   म्हणून तर आता मी निश्चय केला आहे की, या धनगरवाड्यांना अंधारातून उजेडाकडे नेण्यासाठी, काळोखातून प्रकाशाकडे नेण्यासाठी मी जन्मभर प्रयत्न करत राहीन… एक मिणमिणती पणती म्हणून का असेना… परंतू जन्मभर या समाजबांधवांचे जिवन प्रकाशमान करण्यासाठी प्रयत्नं करेन. त्यासाठी ग्रामपंचायतींपासून ते अगदी मंत्रालयापर्यंत विकासकामांसाठी अनेकांना भिडण्याची तयारी मी केली आहे. आणि अर्थातच या मानवतावादी कार्यासाठी तुम्ही सर्वजणही माझ्यासोबत असाल याची मला खात्री आहे.

   त्यामुळे, समाजबांधवांच्या या प्रश्नांवर मी आपल्या सर्वांना सोबत घेवून आपल्या सर्वांच्या मदतीने आणि मार्गदर्शनाने या नव्या लढाईला सुरुवात करत आहे. तेंव्हा माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर कोल्हापूरात आयोजित केलेल्या पहिल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेला जसा आपण भरभरून प्रतिसाद दिला अगदी तशाच पद्धतीने या मानवतावादाच्या आणि राष्ट्रनिर्मानाच्या कार्यासाठी उभारत असलेल्या लढाईलाही आपण मदत करावी. शेवटचा माणूस सुखी व समृद्ध करण्यासाठी उभारलेल्या या संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईला भरभरून पाठबळ द्यावे, अशी पुन्हा एकदा विनंती.. लवकरच भेटू या प्रश्नावरील पुढील आंदोलनात….

 संदीप सिद्धेश्वर कारंडे, संयोजक – धनगर आरक्षण गोलमेज परिषद – महाराष्ट्र
राज्य, हातकणंगले जि – कोल्हापूर, मोबा. ९९६००८४९९९

sandip karande

error: Content is protected !!