कोल्हापुर / प्रतिनिधी
साजणी (ता. हातकणंगले ) येथील न्यु महाराष्ट्र मागासवर्गीय ग्रॅनाईट औद्योगिक संस्था या नावाचे युनीट सन 2009 पासून सुरू होते. पुढे ते काही काळानंतर बंद पडले. या संस्थेसाठी शासनाकडुन ३ कोटी रुपयाहून अधिक अनुदान घेऊन हे युनीट सुरु झाले होते. नंतर ते बंद पडले. शासकीय लेखा परिक्षक देशमुख यांनी सन 2010 ते 2018 या कालावधी मध्ये झालेल्या लेखा परिक्षणामधे शासनाची ३ कोटीहून अधिक फसवणुक झाल्याचे आढळल्यामुळे शासनाचे वतीने त्यांनी संस्थेचे चेअरमन तुळशीदास देसाई कांबळे, सचिव अरविंद मुरूडकर व संचालक कुमार आकाराम कांबळे यांचे विरूद्ध हातकणंगले police पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. या गुन्ह्यातील संशयित आरोपी बरेच दिवस फरारी होते. दरम्यान पोलिसांनी साजणी येथील बंद पडलेले २ कोटी रुपयाचे युनीटचा पंचनामा करून सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांचेकडे सूपुर्त करण्यात आले. आरोपीपैकी संचालक कुमार आकाराम कांबळे यांने सेशन कोर्ट, इचलकरंजी येथे अटकपुर्व जामिनसाठी अर्ज दाखल केला होता. न्या. बावनकर यांनी तो नामंजूर केला.
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर , पो.ह. दिनेश ऊंडाळे हे आरोपीचे मागावर होते. सायबर विभागाची मदत घेऊन दोन दिवस इचलकरंजी, सांगली, मिरज भागात शोध मोहीम सुरू होती. आज पहाटे जयसिंगपुर -इचलकरंजी मार्गावर आरोपी कुमार कांबळे यास त्यांनी शिताफीने पकडले. संशयित आरोपीस इचलकरंजी कोर्टात हजर केले असता त्यास दिनांक 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळाले असल्याचे प्रसिद्धीपत्रक पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी प्रसिद्ध केले आहे .
ही कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, डीवायएसपी जयश्री कदम यांचे मार्गदर्शनाखाली करणेत आली.