प्रत्येक व्यक्तीला आत्मसमाधान हवे असते. हे समाधान सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित असते. व्यक्तीचे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य व सामाजिक आरोग्य हे आजकाल महत्त्वाचे होत आहेत. या तिन्हींचा कुठे ना कुठे वैयक्तिक समाधानाची संबंध असतो. शारीरिक आरोग्य म्हणजे व्यक्तीचे शरीर रोगमुक्त, व्याधीमुक्त असणे.शरीराची क्षमता, कुवत,रोगप्रतिकारशक्ती, कष्टाची तयारी,पर्यावरणीय बदलाशी समतोलता अशा गोष्टी होय. मानसिक आरोग्यामध्ये व्यक्ती मानसिकदृष्ट्या स्थिर, सुखी, आनंदी, समाधानी, मदतकर्ती असणे होय. तर सामाजिक आरोग्य हे व्यक्तीच्या बाह्य जीवनाशी संबंधित आहे. आदर, मानसन्मान, प्रेम, प्रतिष्ठा असणे होय. या तिन्हींचा व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध असतो. मानसिक आरोग्य ठीक नसेल तर त्याचा परिणाम शारीरिक व सामाजिक जीवनावर होतो. हे तिन्हीं एकमेकांना पूरक असतात. काही व्यक्ति सामाजिक जीवनापासून वैयक्तिक जीवन दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. पण याचा परिणाम हा होतोच.समाधानाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. ”व्यक्ती तितक्या प्रकृती” यानुसार कोणाला कशामध्ये किती पातळीपर्यंत समाधान मिळेल हे नेमके स्पष्ट करता येत नाही. एखादी गोष्ट किती खोलवर मनावर घ्यावी याचा संबंध व्यक्तीच्या मानसिक आरोग्याशी असतो. त्यासाठी त्यांना अनुभव, विचारक्षमता, निर्णयक्षमता या बाबी मदत करतात. सामाजिक जीवनात मिळणारे आरोग्य जर वैयक्तिक जीवनात प्राप्त होत नसेल तर व्यक्ती केवळ बाह्यदृष्या समाधानी ठरते. शारिरीकदृष्या सक्षम असेल तर मानसिक आरोग्य राखण्यास मदत होते.शारीरिक क्षमता जशी वाढते तशी व्यक्ती येणाऱ्या आव्हानांना पेलण्यास तयार होते. “उत्तम शरिरात उत्तम मन वास करते” हे यासाठीच म्हणतात.
मानसिक आरोग्य बिघडण्यास कारणीभूत घटक म्हणजे अतिविचार, वेळेवर न खाणे, झोपणे, कशावर जास्त भर द्यावा हे न समजणे, निवडीचा निर्णय घेता येत नसणे होय. शारीरिक व मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य ठेवण्यास मदत करतात.वैयक्तिक जीवनामध्ये व्यक्तीशी संबंधित नाती-गोती, कुटुंब यांचा समावेश होतो.
सामाजिक आरोग्य कितीही चांगले असेल व वैयक्तिक जीवन जरी सुखी, आनंदी, समाधानाचे नसेल तर त्या सामाजिक आरोग्याला तितकासा अर्थ नसतो. वैयक्तिक जीवनात व्यक्ती समाधानी असेल तरच बाहेरच्या वातावरणास किंमत येते.व्यक्तीच्या वैयक्तिक अपेक्षा, इच्छा-आकांक्षा,अपुऱ्या असतील,तिला हव्या असणाऱ्या गोष्टी न मिळालेल्या वा मिळत नसतील तर व्यक्ती समाधानी मानता येत नाही. दुःख विसरण्यासाठी, आनंद देण्या-घेण्यासाठी,चार- दोन गोष्टी सांगण्यासाठी जवळच्या व्यक्ती असणे अपेक्षितच असते. त्यामुळे जीवन सुकर होते. वयाचा इथे जरासाही फरक नसतो. अगदी बालकास समजूत आल्यापासून वृद्धापर्यंत याची गरज भासते. आज या करोना महामारीमुळे तर याची जरूरी अधिक भासत आहे. घरी आल्यानंतर कोणीच नसणारी केवळ यंत्राशी खेळणाऱ्या व्यक्ती जरी आनंदी वाटत असल्या तरी ते यंत्र भावना समजू शकत नाही. भावना समजण्यासाठी व्यक्तीच हवी.आज एकटी व्यक्ती वाममार्गाला बळी पडत आहे.व्यक्तीची व्यक्तीच्या जीवनातील किंमत वाढणे अपेक्षित आहे. जोपर्यंत कुठेतरी व्यक्त होत नाही तोपर्यंत मनातील भावना दबल्या जातात व याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो.खाजगी जीवन जरी सामाजिक जीवनापेक्षा वेगळे असले तरी खासगी जीवनातील सुख, समाधान, आनंद सामाजिक जीवनात प्रेरणाच देत असते.
बौद्धिक दृष्या कितीही परिपूर्ण असून,अफाट संपत्ती पैसा असून, सामाजिक जीवनात मान प्रतिष्ठा असून जरी वैयक्तिक जीवनात सुखी नसेल तर त्या बाहेरच्या गोष्टीला तितकेसे मुल्य राहत नाही. “यश” घरच्यासोबत वाटण्यासारखी नाती टिकवता येत नसतील व यशामध्ये घरचे सहभागी होत नसतील तर वैयक्तिक जीवन अपूर्ण असते.सध्याच्या काळात ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण विकासाचे,प्रगतीचे मार्ग घरापासून सुरू होऊन घरापर्यंत थांबतात. यादरम्यानच्या प्रवासात जे घडले त्यावर उपाय इथेच होतो. बऱ्यापैकी आजारांचे औषध वैयक्तिक जीवनातील समाधान आहे.मानसिक समाधान हे इथेच आहे. तेव्हा जेवढे शक्य तेवढे यासाठी प्रयत्न करता येतील.

8975295297