असंख्य प्राणीमात्रांवर , अनंत उपकार करून ठेवलेले थोर शास्त्रज्ञ लुईस पाश्चर

    जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे..
फ्रान्समधल्या एका गावात कुणी तरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली..
किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘लुईस.’

    निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली..
निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला…
महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..

    पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘लुईस पाश्चर’
लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं…

   मदतनीस रक्सच्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले..

    या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं..
हेच इंजेक्शन सश्याला दिलं ते तर बिचारं पॅरालाईज होत काही क्षणात मरून गेलं..
यावरून एक गोष्ट मात्र लक्ष्यात आली ही ‘लाळ’ जीवघेणी आहे..

   लुईसच्या या प्रयोगशाळेत दिवसरात्र भुंकणारे कुत्रे त्यांची काळजी घेणं-ते चावणार नाही याची काळजी घेणं-लाळ जमा करणं असं क्लिष्ट काम चाललं होतं..

   मदतनीस रक्सनं पाश्चरना एक निरिक्षण सांगितलं ते म्हणजे ‘या लाळेचा संसर्ग थेट मेंदूवर परिणाम करतो.’
यावर प्रयोग करूयात म्हणजे लाळेचं इंजेक्शन शरीरात इतरत्र देण्यापेक्षा थेट डोक्यात देऊन बघितलं तर?
‘छे छेऽऽ’ पाश्चरनं त्याला थेट नकार दिला..
    मानेल तो रक्स कसला? पाश्चर सुट्टीवर जाताच भावानं देऊन टाकलं दोन हेल्दी कुत्र्यांना हे लाळेचं इंजेक्शन
दोन आठवड्यातच हे दोन्ही कुत्रे दगावले..
रक्स थोडा हैराण झाला..आता पाश्चर रागावणार..

    पाश्चर सुट्टीवरनं परतले..त्यांनी रक्सचं कांड ऐकलं
आणि त्यांनी ते ऐकून त्याला चक्क ‘शाबासकी’ दिली..
हे सिद्ध झालं होतं की लाळेतला विषाणु थेट मेंदूवर हल्ला करतो..

   अश्यातच एक आधीच पिसाळेला (?) कुत्रा त्यांच्या प्रयोगशाळेत आणला..त्याला त्यांनी ते लाळेचं इंजेक्शन दिलं आणि ‘मरण’ तर दूर हा कुत्रा चक्क हळूहळू बरा होऊ लागला..
बघता बघता त्याची सगळी लक्षणं नाहीशी झाली थेट तसंच जसं आधी सर्दी खोकला होतो-वाढतो-आपोआप कमी होतो..

    याचा अर्थ शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते..
आजारी कुत्र्यात पण ती तयार झाली होती..

    पाश्चरनी ही संधी हेरली..या कुत्र्यात विषाणुविरुद्ध ॲंटिबाॅडी तयार झाल्या होत्या,ते बचावलं होतं आता वेळ होती ‘लस’ बनवायची..

   पाश्चरनं प्रयोगशाळेतील चारपैकी दोन कुत्र्यांना लाळेचं इंजेक्शन दिलं ते वाचले इतर दोन गेले..
पाश्चरना वाटलं फ्रान्समधल्या यच्चयावत कुत्र्यांना हे इंजेक्शन द्यावं म्हणजे सगळे सुरक्षित होतील..
सल्ला महाग होता आणि श्वानप्रेमीही ‘सरसकट लस द्यावी की नको?’ या संभ्रमात होते..

   विचारविमर्श झाला (फ्रान्स होतं म्हणून,आपल्याकडं एव्हाना मिडिया ‘पिसाळली’ असती) त्यातनं असं ठरलं की थेट कुत्र्यांना लस देण्याऐवजी त्यांनी ज्यांना चावा घेतला त्या माणसांना ही लस दिली तर?

   हे लाॅजिकल होतं,तसंही पिसाळलेल्या कुत्र्यानं चावा घेतल्या घेतल्या लागलीच काही होत नाही विषाणू मेंदूपर्यंत जायला काही दिवस तर घेतोच..

   पण इथंही एक समस्या होती आतापर्यंत असा प्रयोग माणसावर थेट कधीच झाला नव्हता,तो कसा व्हावा?
कुत्रा माणसाला चावल्यावर..
पण जाणुनबुजून कुणी कुत्र्याकडून कसं चाववून घेईल?

   ‘सर्किट’ नसेल तो शास्त्रज्ञ कसला..
अहो फक्त ‘पॅशन’ नाही तर एक ‘वेड’ असावं लागतं एखाद्या गोष्टीपाठी लागण्यासाठी..
पाश्चरनं पिसाळलेल्या कुत्र्याच्या जबड्यात हात घालायची तयारी केली पण तेवढ्यात शेजारच्या खेड्यातून ‘जोसेफ’ नावाच्या एका दहा वर्षीय मुलाला कुत्रा चावल्याची बातमी आली..
जोसेफची आई त्याला पाश्चरकडं घेऊन आली..
पाश्चरनं जोसेफला लस दिली..जोसेफ वाचला..तारीख होती ६ जुलै १८८५.

    हळूहळू ही बातमी जगभर पसरली..जगभरातून पत्रांचा वर्षाव झाला..चर्चा झाल्या..
रशियात एके दिवशी एकोणीस शेतकऱ्यांना कोल्हा चावला..सगळे थेट पॅरीसला जाऊन धडकले..
प्रारंभी भाषेची जरा अडचण जाणवली पण ‘वेदनेची आणि सहवेदनेची’ एक वेगळी भाषा असते..
शेतकऱ्यांसाठी लसी तयार करण्यात आल्या सगळे वाचले..

    त्याआधी अश्या हल्ल्यात अनेक लोकं दगावायचे..
रशियाचा राजा ‘झार’ पाश्चरवर खूष झाला त्यानं पाश्चरला थेट रत्नजडीत बक्षिस पाठवलं आणि संस्थेच्या स्थापनेसाठी पैसेही..

  बालपणी शाळेत मंद-मठ्ठ म्हणून ज्याला हिणवलं गेलं त्यानं जगाची रेबिज-काॅलरा-ॲंथ्रक्स पासून सुटका करत पाश्चरायजेशनसारखी प्रक्रिया जगाला दिली..

    विचार करा एकदा ‘रेबिज’ झाला की आजही औषध नाही..रेबिजनं होणारा मृत्यू हा सगळ्यात दयनीय आणि भयावह असावा..लस शोधून पाश्चरनी या जगातल्या असंख्य प्राणीमात्रांवर अनंत उपकार करून ठेवलेत..

    विश्वासाठी ‘महामानव’ असलेल्या या थोर शास्त्रज्ञाला विनम्र आदरांजली💐

 संकलन- बबन यादव

error: Content is protected !!