हातकणंगले/ प्रतिनिधी

कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणीवर नेमण्यात आलेल्या प्रशासक नेमणुकीस मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती देण्यात आली. सुतगिरणीच्या विरोधात आम. राजूबाबा आवळे यांच्या तक्रारीनुसार संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला होता. अशी माहिती संस्थेचे चेअरमन अनिल कवाळे यांनी दिली. याबाबत कवाळे पुढे म्हणाले , तथाकथित सत्यशोधन समितीचे स्वयंघोषीत अध्यक्ष प्रशांत चांदणे यांच्या संस्थेच्या विरोधात केल्या जाणाऱ्या घडामोडी पाहता तसेच संस्थेस बाधा आणण्याच्या कृत्याची दखल घेऊन व संस्थेच्या हिताविरोधात कृत्य केलेबद्दल सहकार कायद्याच्या नियमानुसार चांदणे यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे.
तथाकथीत सत्यशोधन समितीस सूतगिरणातील एकाही सभासदाचा पाठींबा नाही . ही सुतगिरणी संपूर्णता सभासदांच्या मालकीची असणारी एकमेव मागासवर्गीय संस्था आहे. तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने असणारी राज्यातील एकमेव संस्था असुन काही राजकीय पुढारी अशा स्वयंघोशीत अध्यक्षामार्फत संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या नावाने राज्यात या सूतगिरणीच्या माध्यमातून एक भव्य स्मारक बनविण्याचा ध्यास घेतलेले संचालक मंडळ व संस्थेचे सभासद असा प्रकार हाणुन पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. असे कवाळे यांनी पुढे म्हटले आहे .
संस्थेच्या कामकाजाबाबत वेळोवेळी अहवाल उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर यांच्याकडे पाठविले आहेत .तसेच वेळोवेळी तपासणीही करण्यात आली आहे . मात्र संस्था गिळंकृत करण्याच्या उद्देशाने गेली काही दिवस हालचाली सुरु होत्या . स्थानिक आमदारांच्या दबावापोटी करण्यात आलेली प्रशासक नियुक्ती खोटी ठरवून त्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हा एक संस्थेच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय आहे. संचालक मंडळाचे अपार परीश्रम , कष्ट व अव्याहतपणे संस्था उभारणीकरिता केलेल्या पाठपुराव्यामुळे पंचवीस हजार चात्याची अद्यावत सुतगिरणी उत्पादनास तयार झाली आहे . न्यायालयाने दिलेल्या निर्णयास आधीन राहुन येत्या ३० सप्टेंबर पर्यत प्रत्यक्षात सूत उत्पादनास सुरुवात करण्यात येत असलेचे चेअरमन अनिल कवाळे यांनी सांगितले .
यावेळी संचालक अजित आवळे , विजय वाघ , मधुकर राऊत , गौतम कांबळे आदी संचालक उपस्थित होते , संस्थेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये अँड. संदीप कोरेगावे व एस डी सोळांकुरे यांनी काम पाहीले .
