चंपाषष्ठी (Champashashthi)

    आज चंपाषष्ठी, आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. मार्गशीर्ष महिन्यात येणारे हे नवरात्र देवीच्या नवरात्रासारखेच असते. श्रीमहादेवाचा ‘मल्हारी मार्तंड’ हा एक अवतार होय.

     पुण्याजवळ असलेल्या जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. कृतयुगात ‘मणी’ व ‘मल्ल’ या राक्षसांना ब्रह्म देवाने, “तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही” हा वर दिला त्यामुळे ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले व ऋषीमुनी करीत असलेल्या तपश्चर्येला अडथळा आणून तेथे विध्वंस करू लागले. ऋषीमुनींनी अखेर कंटाळून देवांकडे मदत मागितली.
    भगवान शंकर त्यांचे म्हणणे ऐकून संतप्त झाले. त्यांनी ‘मार्तंड भैरवा’चे रूप घेऊन आपले ७ कोटी (येळकोट) सैन्य घेऊन व कार्तिकेयासह ते ‘मणि’ व ‘मल्ल’ या राक्षसांवर चालून गेले. दोन्ही पक्षात प्रचंड युध्द होऊन अखेर मार्तंड भैरवांनी ‘मणी’ राक्षसाला त्याची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. ‘मणी’ राक्षसाने शरण येऊन “माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे” अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.
   नंतर मार्तंड भैरवांनी ‘मल्ल’ राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन “तुमच्या नांवाआधी माझे नांव जोडले जावे अशी मागणी केली.” तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी (मल्ल+अरी) मार्तंड असे म्हणण्यात येते

   मार्गशीर्ष शुद्ध षष्ठिस चंपाषष्ठी म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंडभैरवाच्या म्हणजे खंडोबाच्या उत्सवास प्रारंभ होतो. जेजुरी येथे हा उत्सव मोठ्या प्रमाणावर होतो. उत्सवकालास खंडोबाचे नवरात्रही म्हणतात. चंपाषष्ठीच्या दिवशी मार्तंडभैरवाचे उत्थापन होते. कुलाचाराप्रमाणे पूजेमध्ये कुंभ अथवा टाक ठेवतात. पहिल्या दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दोन याप्रमाणे वाढवीत सहाव्या दिवशी सहा फुलांच्या माळा त्याला घालतात. षष्ठीला तळई व आरती करतात व हे नवरात्र उठवितात. महानैवेद्यात वांग्याचे भरीत, रोडगा आणि कांद्याची पात यांचा अंतर्भाव आवश्यक असतो. खंडोबावरून नारळ ओवाळून फोडतात व त्याचा प्रसाद आणि भंडारा सर्वांना देतात. तळी भरताना व आरतीच्या वेळी ‘खंडोबाचा येळकोट’ असे म्हणतात. चातुर्मास्यात निषिद्ध मानलेले कांदे, वांगी इ. पदार्थ या दिवसापासून खाणे विहित मानले जाते.

संग्रहित माहिती

संग्रहित माहिती

error: Content is protected !!