वारणानगर/प्रतिनिधी
वारणानगर, ता. येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयातील (warana mahavidyalaya) विद्यार्थ्यांनी अहमदनगर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या, देशभर चर्चेत असलेल्या नामांकित वाद-विवाद स्पर्धेमध्ये गणेश ज्ञानदेव लोळगे व प्रणाली पांडुरंग पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवून कॉम्रेड एकनाथराव भागवत राज्यस्तरीय स्मृती करंडक व रोख रुपये ५००१ चे पारितोषिक तिसऱ्यांदा जिंकले आहे. तसेच राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये त्यांनी सांघिक तृतीय क्रमांक पटकाविताना रोख रुपये २००१ आणि सन्मानपत्र प्राप्त केले आहे.

सांघिक प्रथम क्रमांक साठी “भारतातील नवे कृषी कायदे” या विषयावर त्यांनी वादी- प्रतिवादी मते मांडली. तर वैयक्तिक तृतीय क्रमांकासाठी भारतीय आरोग्य व्यवस्था व कोरोना आणि ऑनलाइन शिक्षण या विषयावर प्रभावी मनोगत व्यक्त केले,असल्याने राज्यात अव्वल ठरल्याचे गणेश लोळगे आणि प्रणाली पाटील यांनी सांगितले.
या स्पर्धेत राज्यातून निवडक ८५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विशेष अभिमानाची बाब म्हणजे विद्यमान प्रा. डॉ. प्रीती शिंदे- पाटील, आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध वक्ते, प्रा.मधुकर पाटील -कोल्हापूर यांनी पूर्वी हा करंडक जिंकला होता. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या या घवघवीत यशाबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनयरावजी कोरे सावकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम , प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
गत काही वर्षांत महाविद्यालयाची राष्ट्रीय व राज्यस्तरावरील वक्तृत्व, वादविवाद, काव्यवाचन, कथाकथन स्पर्धेच्या विजयाची उज्वल परंपरा याही वर्षी कायम राहील आहे. महाविद्यालयाचे २५ हून अधिक विद्यार्थी पाचशेहून अधिक स्पर्धांमध्ये विजेते ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, डॉ. एस.एस. जाधव आणि डॉ. प्रीती पाटील -शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
