सातारा जिल्हा पत्रकार संघाचे मार्गदर्शक, प्रगत विचारांचे खंदे पुरस्कर्ते ईलाही उस्मान मोमीन यांचे निधन

पाटण/वार्ताहर


पाटण तालुका पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य, सातारा जिल्हा व पाटण तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक, प्रगत विचारांचे खंदे पुरस्कर्ते ईलाही उस्मान मोमीन तथा मोमीन सर (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली,विवाहित मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. सातारा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.जमीर मोमीन हे त्यांचे चिरंजीव होत.


पाटण तालुका पत्रकार संघाची पायाभरणी आणि जडणघडणीत मोमीन सर् यांचा मोलाचा वाटा होता. राजकीय, सामाजिक क्षेत्राचे गाढे अभ्यासक असणाऱ्या मोमीनसरांनी पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला तसेच तालुक्यातील सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रासाठी त्यांचे मोठे योगदान राहिले. इंग्रजी भाषेवर विशेष प्रभूत्व असणारे मोमीन सर यांनी येथील माने-देशमुख विद्यालयात अधिक काळ ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि इंग्रजी,हिंदी साहित्याचे अभ्यासक राहिलेल्या सरांनी घडवलेली पिढी आज विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. प्रगत विचारांचा पुरस्कार करण्यात सदैव आग्रही भूमिका घेताना हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुस्लिम सत्यशोधक समितीच्या कार्यासाठी अथक परिश्रम घेतले. राज्यभरातील राजकीय, सामाजिक पत्रकारिता, साहित्य, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व पाटणकर घराण्याशी त्यांचे स्नेहपूर्ण नाते होते. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या पुनर्बांधणीत मोलाचा सहभाग असणाऱ्या मोमीनसरांनी क्रीडा क्षेत्रात पाटण स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हा व राज्य पातळीवर अलौकिक कामगिरी केली. येथील राष्ट्रीय पातळीवरील शुटिंग बाँल स्पर्धांच्या यशस्वी आयोजनात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही योगदान दिले.
पाटण स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाने तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक पर्व संपले असून शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक,क्रीडा क्षेत्रातील विविध संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

error: Content is protected !!