हातकणंगले /प्रतिनिधी
हातकणंगले पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर अज्ञात चोरट्यांनी तीन बंद घराचे दरवाजे उचकटुन रोख रक्कम , चांदीच्या दागिन्यासह घरगुती उपयोगाच्या वस्तू काल रात्री चोरून नेल्या आहेत. चोरीस गेलेल्या मुद्देमालची रक्कम 18750/- रुपये असून चोरट्यांनी चोरी करताना आजूबाजूच्या घरांना कडी लावल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे . याबाबतची फिर्याद आप्पासो श्रीपाल उळागड्डे यांनी हातकणंगले पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , हातकणंगले पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर उच्चभ्रू लोकांची साई कॉलनी आहे. या कॉलनीत काल रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रशांत सुनीलकुमार कोळी यांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूच्या घरातून रोख तीन हजार रुपये व चार हॅन्ड पर्स चोरून नेल्या. तर फिर्यादी आप्पासो उळागड्डे यांच्या घरातील रोख रक्कम 7250 /- रुपये व रावसाहेब लहू शिंगे यांच्या घरातील भाडेकरू असलेले शानूर शिकलगार यांच्या बंद घरातील घरगुती गॅसची टाकी , चांदीचा छल्ला , व पैंजण असे एकूण आठ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची नोंद हातकणंगले पोलिसात झाली असून पुढील तपास हातकणंगले बीट अंमलदार एम्.सी. सुतार करीत आहेत.

मागील वर्षी याच कालावधीमध्ये साखर कारखाने चालू झाल्यानंतर केडीसी बँकेचे एटीएम , वैनगंगा बँकेची स्ट्रॉगरूम व पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेत चोरीचा प्रयत्न झाला होता. यावरून काही ऊसतोड करणाऱ्या कामगारांवर नागरिकांचा संशय बळावला आहे.