आज अंदाजे सायंकाळी ५ वाजण्याची वेळ होती. नेहमीप्रमाणे मी हातकणंगले मधील नम्रता पान शॉप च्या दारात उभा होतो.आणि आज अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी पेठा भागावर दिसत होती. गाड्यांची वर्दळ ,त्यातच बारीक पावसाला सुरूवात झाली होती. तेवढ्यात रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या गाड्यांच्या मागोमाग चालत येणारा अंदाजे दहा – अकरा वर्षाचा मुलगा मला दिसला. लांबून स्पष्ट जरी दिसत नसला तरी सुद्धा त्याच्या चेहरा धीर गंभीर जाणवत होता.त्याच्या खांद्यावर काहीतरी भरलेली भली मोठी पिशवी दिसली. ते ओझ सांभाळत आणि रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या अनेक गाड्या आणि गर्दीकडे पाहत तो पावले टाकत होता. अपेक्षेप्रमाणे काही क्षणातच माझ्या हाकेच्या अंतरावर आला. आणि जवळच असणाऱ्या आमच्या वडाप वाहतूक करणाऱ्या मित्राला बारीक आवाजात म्हणाला.
” च्याच्या मुझे मिरज जाना है .
हा सारा प्रकार पाहणार्या माझ्या डोळ्यांना पुढे जाऊन पाहण्याची इच्छा झाली आणि मी पटकन पुढे गेलो.मुळात या मुलाचं वय काय? तो नेमका कुठला? कुठे गेला होता? त्याच्या पाठीवर एवढं ओझं कशाचा? या साऱ्या प्रश्नानी माझ्या मनात थैमान घातलं होतं.आणि माझ्या अडखळत्या हिंदी भाषेत मी त्याला विचारलं ” तुम्हारा नाम क्या? ” क्षणाचाही विलंब न लावता त्याने उत्तर दिलं.
” तनवीर पठान “

मी पुन्हा काहीतरी विचारायच्या अगोदरच , त्याने दिलेले उत्तर खूप मार्मिक आणि लहान कोवळ्या वयात अनुभवाची शिदोरी खचाखच भरलेली असावी…..
मै मिरज में रहता हु. अगरबत्ती बेचने के लिए कोल्हापूर मे गया था. बारिश भी बहुत थी, सिर्फ चालीस रुपयों के अगरबत्ती बेंचे , मुझे मिरज जाने के लिए 30 रुपय लगते है. एक ट्रक ड्रायव्हर ने मुझे मिरज छोडणेके बजाये इधर छोडा यें गाव कोनसा है मुझे मेरे ” मिरज ” जाना है. ही सगळी वाक्य त्याने एका दमात बोलली.
जगण्याच्या संघर्षात वयाची मर्यादा नसते हे मला आज कळून चुकलं होतं. आणि परिस्थितीचं ओझ अंगावर पडलं की कोणतेही कारण सांगावं लागत नाही , हे वास्तव आज माझ्या डोळ्यासमोर घडलं होतं. हा सारा प्रकार पाहणाऱ्या आळते मधील माझ्या एका मित्राने त्याला काही पैसे देऊ केले. मात्र त्याने ते घेण्यास स्पष्ट नकार दिला .. मै किसी का भी पैसा नही लेता….. अगरबत्ती बेचके ही हमारा घर चलता है . लॉक डाऊन के वजहसे लोगों के पास पैसा नही , इसलिये हमारा धंदा भी अब नही होता. हे त्याने दिलेले उत्तर माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार होतं.मला तुमचे पैसे नकोत पण मला मिरजेच्या गाडीत बसवा ही त्याची हाक मनाला सुन्न करणारी होती .
मिरजेतून कोल्हापूरला जायचं आणि कोल्हापूर मधून मिरजेला यायचं. एवढंच त्याला माहित होतं.पण जगण्याच्या संघर्षातअनेक वळणावर ,अनेक थांबे असतात हे त्याला ही आज कळालं असावं .पण खेळण्या-बागडण्याच्या वयात , अंगावर जबाबदारीचं ओझं घेऊन ते निर्भीडपणे पेलवणारं बारा हत्तीच बळ. त्या कोवळ्या वयात मला आज दिसल .आणि इतकंच नाही तर सहजासहजी मिळालेले पैसे हे स्वीकारायचे नसतात हा स्वाभिमान त्याच्या डोळ्यात प्रखरपणे जाणवत होता.या सगळ्या घटनेने वेगळ्या विचारसरणीत जगणार्या माझ्या आयुष्यात आज हलकल्लोळ माजला असतानाच , कोल्हापूर हून सांगोला कडे जाणारी एस टी आमच्या एका सहकार्याने थांबवली आणि ” तनवीर ” ला गाडीत बसवलं.
जगण्याच्या परीक्षेत अनेक प्रश्नांचा गुंता असतानासुद्धा तनविर ने गाडीत बसूनच बाहेर काढलेला हात , हा माझ्यासाठी अश्रूंचा बांध फोडणारा होता . जगण्याच्या भल्यामोठ्या परीक्षेत तनविर ने दिलेला हा अध्याय माझ्यासारख्या पामराला आदर्श दीपस्तंभ होता. तनवीर च्या जगण्याला, त्याच्या जिद्दीला,आणि त्याच्या स्वाभिमानाला माझा मनापासून सलाम …………!

आळते – हातकणंगले
9011561690