तमिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण देऊन समाजातील तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहामध्ये आणावे ;खास . धैर्यशील माने यांची संसदेत मागणी ….

हातकणंगले /ता.२१: प्रतिनिधी

       केंद्रशासनाने तमिळनाडूच्या आरक्षणाप्रमाणे महाराष्ट्रातील मराठा समाजास आरक्षण देऊन या समाजातील तरुण-तरुणींना मुख्य प्रवाहामध्ये आणावे. मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार द्यावा. कंगना रानावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्या मराठा समाजातील उपेक्षित तरुण-तरुणींकडे लक्ष द्यावे आणि मराठा आरक्षण केंद्राने मिळवून द्यावे . अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी संसद अध्यक्ष ओम बिर्ला यांचेकडे केली.

      खास . माने दिल्ली येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये बोलत होते. महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण देशभर गाजत आहे. मराठा आरक्षणामुळे या समाजातील तरुण-तरुणींना नवसंजीवनी मिळणार आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बत्तीस टक्के लोकसंख्या ही मराठा समाजाची असून त्यापैकी नव्वद टक्के समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व आर्थिकदृष्ट्या मागास आहे. सध्या तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण दिले आहे. मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव केला जात आहे. मी ज्या जिल्ह्यातून आलो आहे तो कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. त्यांनी देशाला आरक्षणाची देण दिली. मात्र महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना मराठा आरक्षणासाठी झगडा करावा लागत आहे. त्यामुळे मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानेही महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार घ्यावा . व मराठा आरक्षण मिळवून द्यावे अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली आहे.

error: Content is protected !!