हातकणंगले / प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मातंगांच्यावर होत असलेल्या अन्याय- अत्याचारांच्या पार्श्वभुमीवर हातकणंगलेचे तहसिलदार प्रदिप उबाळे यांना डिपीआयचे नेते सतिश भंडारे व कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष राजू सुवासे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावरील अत्याचाराची मालिका वाढतच असून समाजात प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बिलोली (जि.नांदेड ) येथील निराधार,असहाय्य मुकबधीर मुलीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला.या प्रकरणातील संबंधीत नराधमांना नव्याने पारीत झालेल्या शक्ती कायद्यांतर्गत एकवीस दिवसांत फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच हिवरा (ता.माजलगांव जि.बीड ) येथे जातीयवादी गावगुंडांनी धुमाकुळ घालत अल्पसंख्य असलेल्या मातंग कुटुंबांना अमानुष मारहाण केली.त्यांच्या शेतपिकांवर डोळा ठेऊन जातीयवाद्यांनी केलेला हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे.यावेळी जातीयवादी गावगुंडांनी कु-हाड, लाठी दगडांचा वापर करुन निरपराध मातंग बंधू भगिनींना गंभीर जखमी केले आहे. या संबंधित प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावे.
वरील दोन्ही घटनांचा डेमॉक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया (DPI) च्यावतीने आम्ही तीव्र निषेध व्यक्त करीत आहोत. अशा प्रकारच्या होत असलेल्या अन्याय-अत्याचाराच्या घटनांना शासनाने वेळीच आवर घालावा व त्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.अन्यथा ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास डिपीआयचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुकुमार कांबळे यांच्या आदेशानुसार जातीयवाद्यांना जशा तसे उत्तर देऊन डिपीआय महाराष्ट्रात तांडव करेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी. असे निवेदनात नमुद केले आहे .
निवेदन देताना सतिश भंडारे (जेष्ठ नेते-DPI) ,राजू सुवासे(कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष -DPI) ,लिलाधर कांबळे (जिल्हा नेते- DPI), बबन शिंदे (हातकणंगले ता.अध्यक्षDPI),प्रमोद बिरांजे (जिल्हा उपाध्यक्ष -DPI) ,अक्षय चौगुले (हातकणंगले शहराध्यक्ष DPI), राहूल यादव (हातकणंगले ता.सरचिटणीस) ,रोहीत माटे (कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस) ,अनिकेत चौगुले संतोष कांबळे ,सरदार कांबळे, तानाजी चौगुले यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
