कोरोना रूग्णांवर उपचार करणारे कर्मचारी हेच खरे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार – समरजितसिंह घाटगे

बोरपाडळे/प्रतिनिधी
    पन्हाळा तालुक्यासारख्या भौगोलिकदृष्ट्या अडचणीच्या भागात, अपुऱ्या सोयी सुविधा असताना सुध्दा कोरोना रूग्णांवर उपचार करणारे कर्मचारी हेच खरे छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार आहेत. असे गौरवोद् गार भाजपाचे जिल्हाध्यक्ष व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी काढले. पन्हाळा येथील एकलव्य कोविड केअर सेंटर भेटीवेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी या सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्वच्छता कर्मचारी ,परिचारिका,पोलीस ,शवागरातील कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.

पन्हाळा येथे एकलव्य कोविड सेंटर मधील कोरोना योद्ध्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे (छाया सचिन वरेकर )

     घाटगे पुढे म्हणाले, सव्वाशे वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीमुळे कोल्हापूर संस्थानमध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या सतर्कतेमुळे सर्वात कमी नागरिकांचे मृत्यू झाले होते. हाच वारसा या कोरोना योद्ध्यांनी जपला आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांचे ते खऱ्या अर्थाने वारस आहेत .
     त्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो .त्यांनी स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी.
     वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनंदा गायकवाड , आरोग्य पर्यवेक्षक गोपाळ पाटील यांनी सेंटरअंतर्गत केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला. यावेळी पंचगंगा बँकेचे चेअरमन राजाराम शिपुगडे ,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी पाटील, तालुकाध्यक्ष सचिन शिपुगडे, मारुती परितकर,अविनाश चव्हाण दिग्विजय पाटील ,माधवी भोसले , इंद्रयणी आडनाईक, अमरसिंह भोसले,सदाम मुजावर ,कोरोना योद्धा सुधाकर जाधव , अनिकेत चौगले, उत्तम बरगे, किसन बुचडे आदी उपस्थित मान्यवर होते.

      कंत्राटी कर्मचाऱ्यांना शाश्वत नोकरीसाठी पाठपुरावा करणार

     कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने भावना व्यक्त करताना स्वतःचा जीव धोक्यात घालून, नियमित वेतन मिळेल याची शाश्वती नसतानासुद्धा कोरोना च्या लढाईत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोना नंतर सुद्धा शाश्वत नोकरीची संधी द्यावी. व श्री घाटगे यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी विनंती केली. घाटगे यांनी कंत्राटी कर्मचार्‍यांसह सर्वच कोरोना योद्ध्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभारणार आहे. अशी ग्वाही दिली.

error: Content is protected !!