कोल्हापूर / प्रतिनिधी
वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून व पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या दोघांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणले. शब्बीर सलिम अली (वय वर्ष -34 ) व नादीर तालीम जैदी (वय वर्ष -48) (दोघेही रा . ग्रामपंचायत शेजारी , न्यू येरखेडा , कामठी , नागपूर) अशी संशयित आरोपींची नांवे असुन त्यांचे अन्य चार साथीदार फरार आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक तानाजी सावंत , सपोनि. सत्यराज घुले , पोहेकॉ. राजेश आडुळकर , अमोल कोळेकर , अजित वाडेकर , नितीन चोथे , संजय पडवळ , पो.ना. सागर कांडगावे , ओंकार परब , रामचंद्र कोळी , संतोष पाटील , रणजित कांबळे , रणजीत पाटील , सहा. फौ. प्रदीप नाकील यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की , कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने मार्केट यार्ड परिसरात गस्त सुरु असताना विना नंबर प्लेटची लाल रंगाची पल्सर थांबलेली दिसली. व चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील फुटेजमधील साम्य असलेले गुन्हेगार असल्याचा संशय आल्याने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता नागपूर येथील शब्बीर अली व नादीर जैदी अशी नांवे निष्पन्न झाली. त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र , चेन , अंगठी असे दागिने व पल्सर गाडी असा एकुण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर त्यांचे अन्य चार साथीदार नसीम मेहंदी अली, युसुफ अमीर अली , मोहसिन गुलाबराजा ( गोलु) व हैदर युसुफ अली हे फरार आहेत. अटक केलेल्या संशयिताकडून शाहूपुरी व लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे व फसवणुकीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले असून अनेक ठिकाणी त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
