विष्णु जलाशयावर कमल पक्ष्यासह रंगीबेरंगी डझनभर पाहुण्यांचे आगमन -पक्षीमित्र युवराज पाटील ; पक्षीमित्र अभ्यासाचा व पहाण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत पक्षीमित्र…..

पारगाव /शिवकुमार सोने
   तळसंदे (ता. हातकणंगले , जि. कोल्हापुर ) येथील दक्षिणेकडील बाजुस विस्तीर्ण भुभागावर पसरलेल्या विष्णु जलाशयावर कमल पक्ष्यासह हिवाळी रंगीबेरंगी डझनभर पाहुण्यांची गर्दी होऊ लागली आहे. या पाहुण्यांचा चावरे येथील वाईल्ड लाईफ कॉन्सर्व्हेशन अँण्ड रिसर्च फौंडेशनचे अध्यक्ष व पक्षीमित्र संघटनेचे सदस्य युवराज पाटील यांनी सांगितले . पक्षीमित्र युवराज पाटील दररोज पक्षीनिरीक्षण व छायाचित्रणासाठी जावुन अभ्यास करतात.

कमलपक्षी हवेत झेपावताना

    जलाशयाच्या काठाशी पाण्यावर पसरलेल्या पानवनस्पतींच्या झुलावरती कमलपक्षी दिसुन आला. पाण्यातील पान वनस्पती खाण्यात मग्न होता. नागरिकांची चाहुल लागताच उडुन उत्तरेकडील दिशेला पाण्यात विसावला. थोडे अंतर चालत जाऊन पाहिले असता त्याच्या शेजारी दुसरा ही कमलपक्षी दिसला. या अगोदर इथे कधी हा पक्षी आढळला नव्हता. याला इंग्रजी मध्ये “फिजंट टेल्ड जकाना” असे म्हणतात. हिंदी मध्ये “पिहो” असे नाव तर शास्त्रीय भाषेत “हायड्रोफासीहानस चिरुगूस “(स्कॉपोली) असे नाव आहे. हा पक्षी तित्तर च्या आकारा एवढा असतो. विणीच्या हंगामात जेव्हा उड्डाण भरतो. त्यावेळी त्याच्या पिससंभारात सफेद रंग व गडद तपकिरी रंग यांचे प्राबल्य असते. तर खालच्या दिशेने वक्राकार झालेली शेपटी यावरून तो कमलपक्षी अगदी सहज ओळखतो. जेव्हा वीण नसते तेव्हा फिकट तपकिरी आणि सफेद रंगाचे छातीच्या वरील बाजुवर काळ्या रंगाचे माळेसारखी खूण असते. पण विळ्याच्या आकाराची शेपटी मात्र नसते. याच्या पायाचा आकार पसरट व लांब असतात.

पाण्यात खाद्याचा शोधात कमलपक्षी


     नर मादी एकसारखेच दिसतात. हे पक्षी एकटे किंवा मोठ्या थव्याच्या स्वरूपात पान वनस्पतींनी भरलेल्या ठिकाणी दिसतात. हा भारतभर सर्वत्र आढळतो. धोका जाणवला की लगेच उडून जातो. आवाज हा नाकातून काढावा असा ट्यु $ ट्यु $ असा असतो. याचे वनस्पतीजन्य पदार्थ, जलीय कीटक, मृदकाय-कवचधारी प्राणी हे प्रमुख खाद्य होय. याचा विणीचा हंगाम जून ते सप्टेंबर आहे. घरटे पाण्यातच तरंगणाऱ्या वनस्पतींच्या पानांवर घालतो. भोवऱ्याच्या आकाराची हिरवट तपकिरी किंवा तपकिरी रंगाची चार अंडी घालतात. मादी अनेक नरांशी संग करते. याची दुसरी जात म्हणजे ब्रॉंझ विंगड जकाना (सावळा कमलपक्षी) मात्र डिसेंबर २०१५ मध्ये आढळून आला होता.

          हवेत घिरट्या घालणारा मधुबाझ शिकारी पक्षी

    जलाशयाच्या पूर्वेला गिरीपुष्पची हिरविगार राई, दक्षिणेला निलिगिरीचे वन, तर पश्चिमेला नीलगिरीची झाडे तर जलाशयाच्या मुख्य बंधाऱ्यावर सागवान नीलगिररी, बाभुळ, नारळ, वड-पींपळ यांची घनदाट वृक्ष राजी आहे. तसेच जलाशयाचा बराच भाग उघडा माळरान व गवताळचा प्रदेश आहे. पावसाळ्यात गुडघाभर तर काही ठिकाणी कमरेपर्यंत उंचच्या उंच गवत उगवत असते . ही गवताळ कुरण पक्ष्यांच्या विणीच्या हंगामासाठी उपयक्त असतात गवतात घरटी करणारे पक्षी हे गवतात आढळणारे कीटक, अळ्या आपल्या पिलांना भरवतात. गवतात वावरणारे सरपटणारे सरीसर्प,पाली,सरडे, नाकतोडे,यांना खाण्यासाठी आकाशात उंच क्षितिजावर (शॉर्ट टोड स्नेक) सापमार गरुड, बोनेलीचा गरुड, कापशी घार, ओरिएंटल हनी बझार्ड(मधुबाझ), शिक्रा आदी शिकारी पक्षी दिसु लागले आहेत. जलाशयाचा बराच भुभाग गवताळ प्रदेशाने व्यापल्याने गवतातील सरीसर्प ,सरडे, पाली, उंदीर, इत्यादी प्राणी खाण्यासाठी मात्र शिकारी पक्ष्याचा वावर वाढला असुन हा जलाशय पाणथळ परिसंस्था व गवताळ परिसंस्था परिपक्व व समृद्ध असलेचे सिद्ध होते.

         भारतीय निलपंख

        भविष्यात विष्णु जलाशय एक मिनी भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळख निर्माण करेल. ऑक्टोबर नंतर वाढलेले गवत शेतकरी कापणी सुरू करतात. सध्या गवत कापणी सुरू आहे. त्यातील उडणारे कीटक, फुलपाखरे, ड्रॅगन फ्लाय, अळया खाण्यासाठी वेडा राघू, भारतीय निलपंख, बुलबुल, वटवट्या, जनावरांच्या पाठीवर बसुन हवेत उडणारे कीटक टिपताना कोतवाल ,इंडियन पीपीट, चंडोल, क्रीस्टेड लार्क, ग्रे वँगटेल, सामान्य गप्पीदास, सायबेरियन स्टोन चॅट, हुदहुद आदी पक्षी सहज दिसुन येत आहेत.या इतर पक्षांच्या बरोबर सुंदर व देखण्या पाहुण्या कमलपक्षालाही पाहण्यासाठी मात्र परिसरातील पक्षीमित्र जलाशय परिसरात गर्दी करू लागले आहेत.

 कापशी घार तारेवर बसून सरडा खाताना

error: Content is protected !!