शिरोली / प्रतिनिधी
टोप ग्रामपंचायत सदस्येच्या पतीसह भावाविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. टोप ( ता. हातकणंगले ) येथील वेताळमाळ परिसरात अतिक्रमण केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. बाबासो प्रकाश लुगडे व अमृत दत्तात्रय पाटील अशी अतिक्रमण करणार्यांची नावे आहेत.
याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, टोप ( ता. हातकणंगले ) येथील वेताळ माळ परिसरातील गट क्रमांक १२७४/१ या सरकारी जागेमध्ये घर बांधले आहे. यासाठी त्यांनी साडेसात गुंठे सरकारी जागेत अतिक्रमण केले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीमार्फत त्यांना दोन वेळा अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भातील नोटीसही बजाविण्यात आल्या होत्या. असे असतानाही बाबासो लुगडे व अमृत पाटील यांनी रविवारी ( ता. १८ ) ग्राम विकास अधिकारी क्वॉरन्टाईन असलेल्या मुदतीत आणखी पन्नास स्क्वेअर फूट जागेमध्ये खोदकाम करून मंदिर सदृश्य बांधकाम करून अतिक्रमण करण्याचा आणखी एक अयशस्वी प्रयत्न केला.
ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय देवकाते यांना याची माहिती मिळताच त्यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिली आहे.
वेताळमाळ येथील सरकारी जागेवर गावातील सुमारे चाळीस लोकांनी लहान मोठी घरे बांधली आहेत. या अतिक्रमणाची चौकशी करून कारवाई करावी. म्हणून गावातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. याची संबंधित खात्या मार्फत सध्या चौकशी सुरू आहे