इचलकरंजी/प्रतिनिधी –
कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून दिवाळीसाठी दहा हजार सानुग्रह अनुदान मिळावे, कामगार नोंदणी व नुतणीकरणाची ऑनलाईन प्रकिया बंद करुन ती ऑफलाईन करावी, त्याचबरोबर मागील एक वर्षापासून बंद असलेले विविध लाभाचे वाटप तातडीने सुरु करावे. यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि , राज्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून या कामगारांसाठी शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाच्या माध्यमातून नोेंदणीकृत बांधकाम कामगारांना कोविड 19 काळात पाच हजार रुपयांची मदत केली. ती अद्याप बहुतांशी कामगारांना मिळालेली नाही. अजुनही लॉकडाऊन काही प्रमाणात सुरुच असल्यामुळे बांधकाम कामगारांना पूर्ण क्षमतेने कामे मिळत नाहीत. बांधकाम मंडळाकडे दहा हजार कोटी रुपये शिल्लक असून ते खर्च केले जात नाहीत. कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या बांधकाम कामगारांना शासनाच्या मदतीची गरज असून कल्याणकारी मंडळाकडून दिवाळीसाठी दहा हजार सानुग्रह अनुदान मिळावे, सन 2019 च्या पुरात कामगारांच्या घरांचे नुकसान झाले. त्याचे अधिकार्यांनी पंचनामा केला असूनही ते अर्ज अजून एक वर्षे झाले धूळ खात पडले असून हे अनुदान तातडीने देण्यात यावे . आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.या शिष्टमंडळात बंडोपंत सातपुते, मुबारक हाकिम, आनंदा गुरव, सदाशिव यादव, रियाज कुरणे, शंकर नंदरगी, अरुण साळुंखे, महेश निंबाळकर, शिवाजी पाटील, अशोक माळी, रुपाली तुरंबेकर आदींचा समावेश होता.