वारणानगर /प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील माले येथे पतीने पत्नीच्या डोक्यात घन घालून खून केल्याची घटना आज पहाटे घडली . मयत माहिलेचे नांव सौ. शुभांगी दत्तात्रय पाटील ( वय वर्ष -३०) असुन संशयित आरोपी पती दत्तात्रय आनंदा पाटील (वय -३५) याला ग्रामस्थांनी कोडोली पोलिसात हजर केले आहे . तसेच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे . याबाबतची फिर्याद मालेच्या पोलीस पाटील सुवर्णा हिरवे यांनी कोडोली पोलिसात दिली आहे .


याबाबत कोडोली पोलीसांतुन मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे माले येथील दत्तात्रय आनंदा पाटील (वय -३५) या तरुणाने त्यांच्या राहत्या घरी पत्नीच्या डोक्यात घन घालून खून केला.कौटुंबिक वादातून हा खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे . संशयित आरोपीला ग्रामस्थांनी कोडोली पोलिसात हजर केले आहे. अधिक तपास कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे करीत आहेत.