जयसिंगपूर / प्रतिनिधी

कोरोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे मागील नऊ महिने राज्यातील जनतेचे त्याचबरोबर सरकारचे मोठे नुकसान झाले आहे . महाराष्ट्र सरकारने टप्प्याटप्प्याने केलेले लाॅकडाऊन आणि आरोग्याबाबत दिलेली सेवा व घेतलेली खबरदारी यामुळे कोरोनाचा संसर्ग चांगल्या प्रकारे रोखण्यात महाराष्ट्र सरकारला यश आले आहे . याचा अर्थ कोरोना संपला असा होत नाही . दिवाळीसह सर्व सण व उत्सव जवळपास संपले आहेत . येणारा काही काळ जनतेने सतर्क राहून आजपर्यंत ज्या पद्धतीने काळजी घेतली आहे. यापुढेही तशीच काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना वरील लस अद्याप निर्माण झाली नाही . निर्माण होऊन ती कधी येईल हेही सांगता येत नाही, सध्या युरोपियन राष्ट्रांसह भारतातील दिल्ली, गुजरात, राजस्थान व गोवा या राज्यांमध्ये कोरोना ची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात आली आहे . महाराष्ट्रात या लाटेचा शिरकाव होऊ नये. यासाठी राज्यातील जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे , अशी भावना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केली आहे.
लोकभावनेचा विचार करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्रिमंडळातील सर्व सहकारी व महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यासमोरील व सामान्य जनतेसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी राज्यात अनलॉक व्यवस्था अमलात आणली जात आहे.
सुरुवातीच्या काळात छोटे-मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले. जिल्हा व राज्य बंदी उठवली, परिवहन सेवा सुरू केली, शासन नियमांचे पालन करा . अशा आदेशाने दिवाळीनंतर मंदिरे व प्रार्थना स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली गेली . शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करत काही प्रमाणात शाळा उघडण्यात आल्या, ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या अभियानाअंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी केली . अटी व शर्थीसह हॉटेल्स,सिनेमा व नाट्यगृहे सुरु करण्यासाठी शासनाने मान्यता दिली, एकूणच सर्वसामान्य माणसाची दिनचर्या सुरू होऊन सर्व सर्व घटकांचे आर्थिक नुकसान होऊ नये. याची काळजी राज्य शासनाने वेळोवेळी घेतली आहे,
महाराष्ट्रात आज कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. याचा अर्थ असा नव्हे कोरोना संपला आहे, या पुढचा काळ कसोटीचा असल्यामुळे जनतेने सहकार्य करावे . आपण व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी . शहरी भागात मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे .
ग्रामीण भागात शासनाने नियुक्त केलेल्या ग्रामसमित्या व प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना मास्क वापरण्यासाठी प्रवृत्त केले जावे असे सांगताना राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले , नवी दिल्ली, गुजरात, राजस्थान व गोवा या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता महाराष्ट्र शासनाने कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. यावरील चारही राज्यातील रस्त्याने, विमानाने आणि रेल्वेने महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह असलेबाबतचा चाचणी अहवाल सोबत असणे सक्तीचे केले आहे,
महाराष्ट्र शासनाने यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या त्रिसूत्रीचा आग्रह धरला होता, मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग चा वापर करणे, व हात वारंवार साबणाने धुणे याचे पालन यापुढे सुद्धा निरंतर करणे गरजेचे असल्याने जनतेने याचा अवलंब करावा, दुसऱ्या लाॅकडाऊन ची नामुष्की महाराष्ट्रावर ओढवू नये , यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन ही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.
