बोरपाडळे/श्रीकांत कुंभार
एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे बेफिकीर माणसांची लहर यामुळे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र सर्वत्र दिसत होते. मात्र अलीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील लक्षणीय असून पन्हाळ्यावर कार्यरत आणि रुग्णसेवेसाठी तप्तरता दाखवून एकलव्य कोविड सेंटरने आपल्या सेवेचा वेगळा ठसा संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात उमटवून सेवा परमो धर्म:| हे ब्रीद वाक्य सार्थ केल्याची माहिती एकलव्य कोविड केअरचे पर्यवेक्षक गोपाळ पाटील यांनी दिली.एकलव्य कोविड केअर सेंटर पूर्णतः कोरोनामुक्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले .

आतापर्यंत 5701 संशयित कोरोनाबाधित रुग्णांचे स्वँब या केंद्रामार्फत घेण्यात आले असून यापैकी 884 रुग्ण पाँझिटीव्ह आले आहेत .या केंद्रावर उपचार घेणाऱ्यांपैकी सोळा रुग्ण दगावले असले तरी फक्त कोविड विषाणू ग्रस्तांची संख्या सात आहे .यापैकी अन्य मृत रुग्णांना अन्य संसर्गाचीही बाधा असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 5701 रुग्णांपैकी 395 रुग्णांना उपचारास उत्तम प्रतिसाद देत असल्याने प्राथमिक उपचारानंतर ‘होम क्वारंटाईन’ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . ही सेवा देताना सात कर्मचारीही कोरोनाबाधित झाले मात्र आहार-विहार आणि योग्य उपचारपद्धतीमुळे ते देखील लवकर बरे झाले. अन्य कोणत्याही कोविड केअर सेंटरपेक्षा ‘एकलव्य’चा मृत्युदर सर्वात कमी आहे. चार पर्यवेक्षक ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे दोन वैद्यकीय अधिकारी,आठ राष्ट्रीय बाल स्वास्थ मिशन वैद्यकीय अधिकारी, कोविड वैद्यकीय अधिकारी पाच, चार फार्मासिस्ट ,पंचवीस नर्स, नऊ लॅबटेक्निशियन, तीन डाटा ऑपरेटर, सहा सफाई कामगार,सात केएमटी ड्रायव्हर,बांधकाम कर्मचारी, एम एस ई बी कर्मचारी , शिवाय बंदोबस्तास असणारे पोलिस कर्मचारी असा एकूण 76 लोकांचा समूह या सेंटरवर सेवेसाठी सज्ज असतो.
दिवसागणिक या सर्वांची आस्था पूर्वक चौकशी होत असल्याने ‘एकलव्य’ कोविड केअर सेंटर म्हणजे रुग्णांची सेवा करणारे दुसरे कुटुंबच असल्याची प्रतिक्रिया येथील रुग्णांनी दिली. प्रांताधिकारी अमित माळी तहसीलदार रमेश शेंडगे, नायब तहसीलदार विनय कौलवकर ,वैद्यकिय अधिक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, तालुका आरोग्यधिकारी डॉ.अनिल कवठेकर, लॅब टेक्निशियन सुधाकर जाधव यांनी ही आपत्ती राष्ट्रीय आपत्ती समजून प्रत्येकाने आपाआपली जबाबदारी प्रामाणिकपणे उचलून केंद्रावरती जातीने लक्ष घातल्याने आज एकलव्य कोविड केअर सेंटरवरती एकही रुग्ण उपचार घेताना दिसत नाही .दाखल झालेले सर्वच रुग्ण डिस्चार्ज घेवून कोरोना मुक्त झालेले आहेत. एकूणच ‘एकलव्य’ कोविड केअर सेंटरने आपले ‘एकलव्य’ नाव सार्थ केले आहे.
बाधित रुग्णांची संख्या कमी आली असली तरी एकाच केंद्रावरती इतक्या कार्यतत्पर अधिकारी अणि कर्मचाऱ्यांची विनम्र सेवा आपुलकी अणि माणूस म्हणुन आपल्यातली माणुसकी दाखविल्याने हे शक्य झाले असे प्रांजळ मत अनेक रुग्णांनी व्यक्त केले. ‘एकलव्य’ आज कोरोनामुक्त असले तरी इथून पुढच्या धोक्यांसाठी सावधान अणि सज्ज आहे. पुन्हा कोरोनाची संभाव्य लहर येवू नये . अशी लोकांनी खबरदारी घ्यावी . असे येथील सर्वानाच वाटते. इथून कोरोनामुक्त झालेल्या प्रत्येकाचे येथील कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केले आहे. शिवाय परिसरात वैद्यकीय पथकाद्वारे जनजागरण केले आहे. त्यामुळे येथील अनेक गावांत सजग आणि सावधानतेमुळे कोरोना वेशीपासून माघारी फिरला आहे. यापुढेही एकलव्य कोविड केअर सेंटर मधील संख्या शून्य राहणे हे संपूर्ण टीमचे यश आहे. आणि ते अन्य केंद्रांना अनुकरणीय आहे एवढे नक्की .
डिस्चार्ज नको, इथेच ठेवा
एकलव्य कोविड सेंटर मध्ये दाखल रुग्ण सुरुवातीस दडपणाखाली असत मात्र येथील खेळीमेळीचे वातावरण आणि रुग्णांसाठीचे विधायक उपक्रम पाहून याठिकाणी सर्वच अधिकारी, कर्मचारी ,आणि त्यांच्याकडून मिळणारी सेवा पाहून सर्वानाच आपण ‘एकलव्य’ नावाच्या आपुलकीच्या घरातच दाखल झालो आहोत असे वाटते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अनेक जणांचे डोळे पाणावले. घरातही अशी कुणी देखभाल करणार नाही. या जाणिवेने अनेकांनी ‘डिस्चार्ज नको इथेच ठेवा’ असे सांगितल्याचे प्रांताधिकारी अमित माळी यांनी सांगितले.