जयंत करंजवकर :कोरोना आणि व्यवस्थेचा बळी

जयंत करंजवकर

       जयंत करंजवकर गेले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चालताबोलता संदर्भग्रंथ कायमचा बंद झाला. सुरुवातीच्या काळात मी त्यांना साहेब म्हणायचो. पण नंतर ते कधी कसे जयंतकाका झाले ते कळलेच नाही. त्यांच्यासारखा दिलदार, मोकळाढोकळा, निर्व्यसनी व मित्रांना सतत मदत करणारा माणूस आपल्यातून गेला, हे पचवणे तसे अवघडच. तसं पाहिलं तर इथे कुणी अमरपट्टा घेऊन जन्माला येत नाही. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्यु’, हाच इथला नियम. पण आयुष्यभर नीतिमत्ता जपणाऱ्या जयंतकाकांना जाताना अनितीने ग्रासावे, याचाच फार त्रास होतोय.

      २ ऑगस्टला ते ‘रुटीन चेकअप’साठी गेले होते. तसा त्यांना काही त्रास नव्हता, तरी फॅमिली डॉक्टर व क्षीरसागर हॉस्पिटलच्या डॉ. प्रसिता क्षीरसागर यांच्या आग्रहाखातर त्यांनी कोरोना रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्ट करून घेतली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल व्हायला सांगितलं. त्यांनी सरकारी रुग्णालयात दाखल व्हायचे ठरवले. ज्येष्ठ पत्रकार आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे सगळीकडेच चांगले संबंध. पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनीही सहकार्य करण्याचे वचन दिले. पण पालिका रुग्णालयात तुम्हाला नीट ट्रीटमेंट मिळणार नाहीत. तिथे आवश्यक उपकरणे नाहीत, वगैरे कारणे सांगून डॉ. क्षीरसागर यांनी त्यांना स्वतःचे ‘आर्थिक लागेबंधे’ असलेल्या ‘वेल्लम हॉस्पिटल व डायग्नोस्टिक, गांधीनगर, ठाणे’मध्ये दाखल व्हायला भाग पाडले.

          हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर त्यांनीच मला फोन करून कळविले. ‘सर्दी-ताप आला’ हे सांगावं इतक्या सहजपणे ‘कोरोना झालाय’ म्हणून सांगितलं. त्यांनतर सलग १५-२० मिनिटे ते माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहिले. बोलणे नेहमीप्रमाणे खणखणीत. त्यांना कसलाच त्रास होत नव्हता. हे बघून मी त्यांना रिपोर्टबद्दल शंका बोलूनही दाखवली. त्यांच्या आणि मुलगा अक्षयच्या मनातही हीच शंका होती, पण ‘नेहमीच्या डॉक्टरांनी सांगितलंय तर कशाला रिस्क घ्या’ हाही प्रश्न होता. शिवाय ‘तुम्ही वेळ घालवलात तर काहीही होऊ शकते’, ही डॉक्टरांनी घातलेली भीतीही होती, त्यामुळे काहीच करता येत नव्हते.

        पहिले दोन दिवस त्यांना काहीच लक्षणे नव्हती. ऑक्सिजन लेव्हल पण व्यवस्थित होते. पण या दिवसांत ते ज्या विश्वासाने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते, तो डॉक्टरांवरचा विश्वास मात्र तुटत गेला. रॅपिड टेस्ट तशी कमी विश्वसनीय. सगळ्यांचीच टेस्ट करत बसणे शक्य नसते, म्हणून लावलेली चाळणी. या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर RT-PCR टेस्ट केली जाते. हॉस्पिटलमध्ये दाखल होताना ‘आम्ही इथेच तुमची पुढची टेस्ट करून घेऊ’ म्हणून आश्वासन दिले गेले. पण प्रत्यक्षात शेवटपर्यंत अशी काही टेस्ट झालीच नाही. तरीही अक्षयकडे फार्मसीचे रोजचे १५-२० हजार मागितले जाऊ लागले. म्हणजे लक्षणे काहीच नाहीत. आजार आहे की नाही माहीत नाही, पण औषधांचे मीटर चालू. प्रश्न पैशांचा नव्हता. पण या पैशांतून नेमकी काय औषधे आणली जातात, याचे प्रिस्क्रिप्शन मिळत नव्हते.

         पहिले दोन दिवस तर रोज एक बॉक्स (५० जोड्या ) हॅण्ड ग्लोव्हस लिहून दिले. तिसऱ्या दिवशी अक्षयने प्रश्न उपस्थित केला, मग चुकून लिहिले गेले वगैरे सारवासारव केली. कोरोना पेशंटला भेटता येत नाही हे मान्यच, पण त्यांना फोनवर बोलायलाही बंदी घातली. कोरोनावर तसेही काही औषध नाही. स्वतःला सांभाळायचं एवढाच उपाय. पण इथे तर सतत माणसांच्या गराड्यात राहणाऱ्या, बोलक्या माणसाचा काहीच कारण नसताना कोंडमारा केला जात होता. कसे टिकणार मनोधैर्य? आराम मिळावा म्हणून बाकीच्यांचे फोन बंद केले, हे एकवेळ समजू शकतो, पण अक्षयलाही त्यांच्याशी बोलू दिलं जात नव्हते. अगदीच आग्रह केला तर नर्सच्या उपस्थितीत एक मिनिटांचे संभाषण. नाहीतर मग काउंटरवरच्या मुलाला हजार रुपयाची लाच देऊन अक्षय त्यांच्याशी बोलून घ्यायचा. त्यावेळी त्यांनी ‘जेवणही नीट मिळत नसल्याची’ तक्रार केली होती. त्यामुळे अक्षयही अस्वस्थ झाला होता.

         ४ ऑगस्टला रात्री अक्षयचा फोन आला. तोपर्यंत जयंतकाकांना ऑक्सिजनच्या नळकांड्यात जखडवून ठेवले गेले. ‘काय चाललंय काहीच कळत नाही. पैशाचा प्रश्न नाही. खासदार गजानन कीर्तिकर लागतील तेवढे देतो म्हणालेत. म्हाडाचे माजी अध्यक्ष मधू चव्हाण यांनी मदत पाठविली. आमदार प्रताप सरनाईक, नीलम गोऱ्हे सगळ्यांचे फोन येऊन गेले. स्थानिक नगरसेवक आधाराला आहे. पण हे डॉक्टर काय उपचार करताहेत तेच कळत नाही. कसलेच डिटेल्स देत नाहीत. आजच पिंक फार्मसी, मुलुंड येथून रेमडेसिव्हिर नावाचे औषध आणलंय. ते इथे मिळत नाही, ब्लॅकने मागवलंय म्हणतात. त्यासाठी आधार कार्ड वगैरे लागतं म्हणतात. २७ हजारांची ५ इंजेक्शन्स आणलीत.’ वगैरे वगैरे सांगत राहिला. आता ‘ब्लॅकच्या औषधांना आधार कार्ड का लागतं? सरकारी मान्यताप्राप्त कोविड सेंटरने ब्लॅकची औषधे पेशंटना द्यावीत का? त्यांच्या दर्जाची खात्री कोण घेणार? रेमडेसिव्हिरचे साईड इफेक्टसही बरेच आहेत? वयोमानानुसार काकांना ते झेपेल का? अजून कोरोना कन्फर्म झालेलाच नाही, तरी औषधे द्यायची का?’ असे बरेच प्रश्न होते. त्यात पेशंटला बघायला डॉक्टरही येत नव्हते. त्यामुळे अक्षय अस्वस्थ होता. हॉस्पिटलने सांगितल्याप्रमाणे त्याने पैसे काढून दिले, पण काहीतरी चुकतंय याची त्यालाही जाणीव होती.

         त्या रात्री २:३० पर्यंत आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. माळवी मदत करतील याची खात्री होती. सकाळी त्यांना फोन करायचा आणि नितीन तोरसकर, दिलीप इनकर अजून काही पत्रकार मित्र वगैरेंनी मिळून सकाळी वेल्लम हॉस्पिटल गाठायचे. तिथून डिस्चार्ज घेऊन, काकांना सरकारी रुग्णालयात दाखल करायचे ठरलं. काही कॉम्प्लिकेशन्स नकोत म्हणून सोबत एखादा विश्वासातला डॉक्टर घ्यायचा विचार होता. दीपक कैतके याने ‘जेजे’ला दाखल करवून घेण्याची तयारी दर्शवली. पण दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अक्षयला चांगलेच घाबरवून सोडले. इथून बाहेर पडलात तर दुसरीकडे जाईपर्यंत काहीही होऊ शकते, म्हणून सांगितले. साहजिकच अक्षयचा धीर खचला. पर्यायाने आमचाही नाईलाज झाला. जयंत काकांची परवड सुरुच राहिली.

          काल अक्षयने मागे लागून त्यांची भेट मागितली. तेव्हा त्यांना मोशन झाली होती. ती सुकून गेली तरी साफ केलेली नव्हती. अक्षयने विचारले तर ‘करु करु’ एवढेच उत्तर मिळाले. (हेही मला अक्षयनेच सांगितले.) एका पेशंटची एवढी हेळसांड? बरं तिथे सरकारी दवाखान्यांसारखी पेशंटची गर्दीही नाही. तरी का इतकं दुर्लक्ष? संध्याकाळपर्यंत डॉक्टरांची फेरीही झाली नव्हती. तरीही पुन्हा औषधांसाठी ४० हजार मागितले. कसली औषधे त्याचे डिटेल्स नाहीच. आणि आज ६ तारखेला पहाटे ४:३० वाजता जयंत काकांना हृदयविकाराचा झटका आला. ते गेले. ही हानी आणि दरम्यानच्या काळात करंजवकर आणि परिवाराने जे सोसले त्याची जबाबदारी कोण घेणार? वेल्लम हॉस्पिटलचे डॉ. सुशील साखरे आणि डॉ. प्रसिता क्षीरसागर यांच्यावर काय कारवाई करणार?

         जयंत करंजवकर वय वर्षे ७०. छान दीर्घ आयुष्य जगलेत ते. पण आयुष्यभर सचोटीने जगलेल्या, सगळ्यांची काळजी घेणाऱ्या या माणसाचे वैद्यकीय व्यवसायातील नफेखोरीने शेवटी असे हालहाल करावेत याचं वाईट वाटतंय. त्याचबरोबर अजून एक भीती आहे. ‘जयंत करंजवकर सारख्या अफाट लोकसंग्रह असलेल्या माणसाच्या वाट्याला हे असं येत असेल, तर सामान्य माणसाचे अशा खासगी दवाखान्यात काय हाल होत असतील?’ या कल्पनेनेच कापरं भरतंय. इथे अक्षय सतत पाठपुरावा करत होता. अनेक ठिकाणी पेशंटचे नातेवाईक दवाखान्यात पाय ठेवायची हिंमत करत नाहीत. त्यांची काय अवस्था होत असेल? याची कल्पनाही करवत नाही.

        जयंत काकांना खरंच कोरोना होता का? याचं उत्तर आता मिळणार नाही. मिळालं तरी उपयोग नाही. पण आतातरी कोरोनाच्या भीतीआडून चालवलेला हा भयाण खेळ थांबायला हवा. ‘तरुण/ धडधाकट माणसं, कुठल्याही लक्षणांशिवाय पॉझिटिव्ह येतात. आणि दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अटॅकने जातात’ अशा घटना वारंवार कानावर येताहेत. हे नक्की कोरोनाचे बळी आहेत, कि भीतीचे? चुकीच्या औषधांचे, कि हॉस्पिटलच्या बेपर्वाईचे? याचा तपास व्हायलाच हवा.

       अनीती आणि नफेखोरीच्या वाटेने चाललेल्या दवाखान्यांवर प्रशासनाने अंकुश ठेवायला हवा. ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ नुसती कागदावर असून उपयोग नाही, अंमलबजावणी देखील व्हायला हवी. सरकारी दवाखाने अपुरे पडताहेत, तेव्हा खासगी दवाखान्यांत नेमकं काय चाललंय याचा हिशेब ठेवायला हवा. नाहीतर कोरोनापेक्षा ही मुर्दाड व्यवस्थाच जास्त बळी घेईल, एवढं नक्की.

उन्मेष गुजराथी
(9322755098)

error: Content is protected !!