यश पहायला शामरावआण्णा हवे होते..!

     पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रातील एक धाडशी, स्पष्टवक्ते आणि निर्भिड स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती, ते सहकारमहर्षी शामरावआण्णा पाटील. पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार आणि समाजकारणातील एक मोठे नाव.. समाजकारणात आणि राजकारणात या नेतृत्वाने नेहमी अन्यायाविरुद्ध लढाई केली.

   आज यड्रावकर गटाने आणि शामरावआण्णांच्या वारसांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळविलेले सहकार, समाजकारण आणि राजकारणामधील यश पाहण्यासाठी शामरावआण्णा आपल्यामध्ये हवे होते , असे राहून राहून मला वाटते…. कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने स्वातंत्र्योतर काळापासून समाजकारण व राजकारणात ज्यांनी दबदबा निर्माण केला होता . त्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याशी अनेक वर्ष सोबत केली, संस्थात्मक राजकारणात विश्वासू सहकारी म्हणून काम केले, निष्ठेने सेवा केली, पण नंतरच्या काळात त्यांच्या बरोबर संघर्ष करावा लागला . अनेक वर्षाच्या संघर्षानंतर संस्था आणि कार्यकर्त्यांचे नुकसान होते, संघर्षापेक्षा संस्था उभारण्याला प्राधान्य दिले पाहिजे . हे ओळखून घेत
   जीवनाच्या उत्तरार्धात शामरावआण्णांनी सहकारामध्ये अनेक संस्था रात्रंदिवस राबून उभारल्या, आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले, स्वतःच्या कार्यकर्त्यांचा गट निर्माण केला त्या सहकारमहर्षी शामरावआण्णा यांची आज पुण्यतिथी..
पुण्यतिथी दिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली…!

    शामरावआण्णांच्या प्रत्येक पुण्यतिथीला प्रत्येक कार्यकर्ता अथवा जुना एखादा सहकारी, आण्णांच्या आठवणींना सांगताना आण्णांनी केलेल्या संघर्षाच्या, आण्णांनी घेतलेल्या कष्टाच्या, आण्णांना आलेल्या यशापयशासारख्या अनेक गोष्टींवर चर्चा करीत असतो, आणि आण्णांच्या आठवणींना उजाळा देत असतो, माझे सुदैव म्हणजे कार्यकर्ता म्हणून किंवा नंतरच्या काळात सेवक म्हणून काही वर्षे का असेना शामरावआण्णांचा सहवास मला लाभला,
    शामरावआण्णांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत, कार्यकर्त्यांवरचे प्रेम, याबाबत त्यांच्यातील लोकांना आपले करणारा स्वभावगुण मी जवळून पाहिला होता, अन्यायाविरुद्ध उभे राहायचे हा शामरावआण्णांनी दिलेला निर्भीडपणा आजही आम्ही कार्यकर्ते तेवढ्याच ताकदीने नफा नुकसानीची पर्वा न करता वापरत असतो, त्यामुळे आजही काही वेळेला अन्याय झाला तर पुढची मागची परवा न करता तुटून पडायचे ही आण्णांनी दिलेली शिकवण व्यवहारात आम्ही वापरत असतो,शामरावआण्णांना सहकारामध्ये खूप रुची होती,
   साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका, औद्योगिक वसाहती, उद्योग, व्यवसाय आपल्या परिसरात उभे राहिले पाहिजेत, आपल्यावर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला आपल्या परिसरात चांगला भाव मिळाला पाहिजे, आपल्या परिसरातील शेतकऱ्यांची मुलं छोटी-मोठी उद्योजक झाली पाहिजेत, कार्यकर्त्यांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, आणि एकूणच आपला सर्व परिसर आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन आपल्या परिसरातील जनतेच मागासलेपण दूर झाले पाहिजे, शामरावआण्णांची ही नेहमीची तळमळ, नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे, नवे काहीतरी आपल्या परिसरात यावे, परिसरातील युवकांना स्पर्धेच्या जगात दर्जेदार शिक्षण मिळावे, असे शामरावआण्णांना नेहमी वाटायचे आणि आपणच हे सारे सुरू करायचे असाही त्यांचा ध्यास होता, तत्कालीन नेते देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सोबत असताना स्वर्गीय शामरावआण्णा पाटील-यड्रावकर, पी. बी. पाटील , दिनकरराव मुद्राळे या सर्व दिग्गजांनी एकत्रित येऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याच्या परिसरात सहकाराचे मोठे विश्व निर्माण केले होते, नंतरच्या काळात गटातटाच्या राजकारणामुळे आणि राजकीय संघर्षामुळे सोन्याचा धूर निघणाऱ्या या सहकारावर अवकळा आली आणि बघता बघता दोन्ही गटाकडून सहकारामधील नावाजलेल्या संस्था नजरेसमोर उद्ध्वस्त होत गेल्या,
   या संस्था वाचल्या पाहिजेत ही शामरावआण्णांची धडपड होती, पण शामरावआण्णा यांना अनेक वर्षे संघर्ष करून संघर्षामधून कोल्हापूर जिल्हा शेतकरी विणकरी सूतगिरणी शिवाय स्वतःकडे काही राखता आले नाही, पण सूतगिरणी जेव्हा ताब्यात मिळाली . तेंव्हा वस्त्रोद्योगामध्ये प्रचंड मंदी होती, आणि सूतगिरणी चालवणे आर्थिक दृष्ट्या परवडण्यासारखे नव्हते त्यामुळे या संस्थेला लवकर उर्जितावस्था मिळाली नाही, तिकडे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी पंचगंगा कारखाना आपणाकडे ठेवण्यात यश मिळवले असले तरीसुद्धा रत्नाप्पांण्णा कुंभार यांना साखर कारखाना चालवणे सुद्धा अतिशय कठीण बनले होते, हे वास्तव आपण सर्वांनी पाहिले आहे, संघर्षातून काही होत नाही, संस्थांचे आणि कार्यकर्त्यांचे प्रचंड नुकसान होते आणि नुकसानीशिवाय संघर्षातून काही मिळत नाही हे ध्यानात आलेल्या शामरावआण्णांनी संघर्ष थांबवून प्रचंड मेहनत करून सहकारी तत्त्वावरील शरद साखर कारखाना उभारला, जिल्हा सूतगिरणीला पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला, पार्वती औद्योगिक वसाहत जोमाने सुरू ठेवली, बँकेची उभारणी केली आणि नव्याने या संस्थामध्ये हळूहळू का होईना प्रगती करताना या संस्था समर्थपणे कशा चालतील यासाठी प्रयत्न केले, हे संपूर्ण करीत असताना शामरावआण्णांनी स्वतःच्या तब्येतीकडे कधी लक्ष दिले नाही, सगळं वैभव उभा राहिलं आणि शामरावआण्णा आपणातून निघून गेले,
अनेक वर्ष
    सहकाराचे व समाजकारणाचे राजकारण करीत असताना शामरावआण्णांनी प्रदेश पातळीवर राजकीय क्षेत्रात स्वतःचे वलय निर्माण केले होते, जवळ पद नसले तरी पक्षीय पातळीवर राज्य नेतृत्वामधील महत्त्वाची मंडळी शामरावआण्णांना जवळून आणि नावाने ओळखत होती, वेळोवेळी झालेल्या या लोकांच्या सहकार्य व मदतीने त्यांनी त्यांच्या या संघर्षाच्या काळात सहकाराबरोबर राजकारण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण राजकारणामध्ये त्यांना अपयश आले,
   आपणही आमदार व्हावे. अशी आण्णांची इच्छा असणे स्वाभाविक होते, का वाटू नये? पण संस्थात्मक उभारणीमध्ये आण्णांना जे यश मिळालं ते राजकारणामध्ये मिळाले नाही, हयातभर संघर्ष आणि केवळ संघर्ष करून ज्यांनी शेवटी सहकारामधील आदर्श संस्था उभारल्या, संस्थात्मक पातळीवर मोठे काम करत अनेक संस्थांमध्ये ऊर्जितावस्था आणली, त्या शामरावआण्णांना राजकीय यश लाभले नाही . हे कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेले शल्य होते, त्यांच्या पश्चात्य त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या कर्तृत्वाचे आणि विचाराचे वारस महाराष्ट्र राज्याचे विद्यमान सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, सांस्कृतिक कार्य, वस्त्रोद्योग, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपले लहान बंधू जयसिंगपूर चे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर व निष्ठावंत सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्वर्गीय शामरावआण्णांची अपुरी राहिलेली सर्व स्वप्ने अतिशय दमदार पद्धतीने वाटचाल करत पूर्ण केली, पश्चिम महाराष्ट्रामधील यशस्वी आणि अभ्यासू सहकार मधील नेतृत्व अशी ओळख निर्माण करून आदर्श संस्था तर चालवल्याच, पण यशस्वी राजकारण सुद्धा केलं,
      कमी वयात पडलेल्या जबाबदारीचे भान ठेवून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जुन्या-नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन दहा-बारा वर्ष सावध रीतीने समाजकारण करीत राजकारणात पाय रोवले, आणि केवळ आमदार नव्हे शिरोळ तालुक्याला आणि यड्रावकर गटाला लागलेला अपयशाचा कलंक धुऊन काढला, राजेंद्र पाटील-यड्रावकर नामदार झाले, अनेक जाणकारांचे अंदाज चुकवत जवळपास लाखभर मतानी ते आमदार झाले, मी आणि माझ्यासारखे अनेक जण आम्ही स्वर्गीय शामराव पाटील यड्रावकर साहेबांचे भाग्यवान कार्यकर्ते ठरलो, स्वताला भाग्यवान एवढ्यासाठी समजतो राजेंद्र पाटील-यड्रावकर फक्त आमदार नव्हे नामदार होऊन राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा झाले हे पाहण्याचे सौभाग्य आणि त्या यशस्वी टीममध्ये संघर्ष आणि काम करण्याचे भाग्य आम्हा कार्यकर्त्यांना लाभले. स्वतःच्या मुलांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळवलेले दैदिप्यमान यश पाहण्यासाठी
आज राहून राहुन मला वाटते…….
सहकारमहर्षी शामरावआण्णा आज हवे होते!

शामरावआण्णांच्या स्मृतीदिनाला आम्ही नेहमी त्यांच्या कार्याचे पोवाडे गातो आज मला पोवाड्या पेक्षा शामरावआण्णा हयात असते तर……
केवळ हा एक प्रश्न माझ्यासह कार्यकर्त्यांना सतावतो आहे,
त्या संघर्षयात्रीने आजचे हे सोन्याचे दिवस किमान पाहिले असते हे तरीसुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे जीवन सार्थक झाले असते.. एवढेच मला या पुण्यतिथीदिनी म्हणावे असे वाटते,
पण पहाडासारखा निधड्या छातीचा लोकनेता यश पायाजवळ येत आहे तोपर्यंत आपल्यातून निघून गेला.. त्यांच्या रक्ताचे आणि विचारांचे वारसदार नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि त्यांचे कर्तुत्ववान बंधू संजय पाटील-यड्रावकर या भावांनी वडिलांनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करून त्यांना आदरांजली तर कधीच वाहीली आहे,
त्यांच्या स्मृतींना खऱ्या अर्थाने उजाळा द्यायचा असेल तर त्यांनी दिलेल्या विचारावर यशाची ही चढती कमान आणखी उंच नेताना स्वर्गीय शामरावआण्णांच्या पासून यड्रावकर परिवाराशी निष्ठेने सोबत केलेल्या सर्व मावळ्यांना सोबत घेऊन पुन्हा जोमाने वाटचाल करावी.. आणि राज्याच्या मंत्रिमंडळात येणाऱ्या प्रत्येक वेळेला राजेंद्र पाटील-यड्रावकर हे नाव सातत्याने लिहिले जावे, राजभवनावर शपथविधी ची पंचपदी व्हावी,असे समाजकारण व राजकारण या दोन्ही भावांच्या हातून व्हावे… कार्यकर्ता म्हणून शामरावआण्णांच्या स्मृतीस अभिवादन करताना एवढीच माफक अपेक्षा…
आदरणीय शामरावआण्णा यांच्या स्मृतीस पुण्यतिथी दिनी पुन्हा विनम्र अभिवादन.!

बबन यादव
माजी सरपंच चिपरी.

error: Content is protected !!