इस्लामपूर / ता .१७
कोरोना महामारीमुळे आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी येत्या आठवड्यात राज्यात आरोग्य विभागाच्या १७ हजार जागा मेरीटने भरल्या जातील, अशी घोषणा आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी केली. कोरोना लढाईत ज्या खासगी डॉक्टरांचा मृत्यू होईल, त्यांनाही ५० लाखांचे कवच दिले जाईल, त्यामुळे आयएमएच्या डॉक्टरांनी सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

इस्लामपुर येथील उपजिल्हा रुग्णालयात टाटा ट्रस्टने उभारलेल्या अद्यावत कोविड हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंग नाईक, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डूडी, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा प्रमुख उपस्थित होते.
मंत्री राजेश टोपे म्हणाले, उपजिल्हा रुग्णालयाचा चेहरा पूर्ण बदलला आहे. सरकार आणि आरोग्य विभाग टाटा ट्रस्टचे ऋणी आहे. कारण या निधी व्यतिरिक्त व्हेंटिलेटर, पीपीई कीट, रुग्णवाहिका, मास्क यासाठी टाटांनी मोठी मदत दिली आहे. खासगी रुग्णालये ताब्यात घेत आहोत, जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणारे अधिकार, मोफत रुग्णवाहिका, पोलीस कर्मचा-यांना ५० लाखाचा विमा हे महत्त्वाचे निर्णय घेतलेत. खासगी डॉक्टर्सनाही ५० लाखाचे कवच देणार आहोत. लस येईपर्यंत आपणाला मास्क, सॅनिटायझर वापरत कोरोनासोबत जगावे लागणार आहे, त्यामुळे संबंधित अनधिकृत खर्चावर नियंत्रण आणले जाईल. लोकशाही आघाडीचे सरकार प्रामाणिकपणे लोकहिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. कोरोनाच्या महामारीत कुणाकडेही दुर्लक्ष होणार नाही. ट्रेसिंग आणि अलगीकरण महत्त्वाचे आहे. टेस्टिंग करण्यात कमी पडू नका. कुणालाही लक्षण दिसले तर एक टक्काही हयगय करू नका. अंगावर काढू नका, ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा.
जयंत पाटील म्हणाले, मार्चमध्ये कोव्हिडने धडकी भरवली होती. त्यावर इस्लामपूरकरांनी मात केली. सध्याच्या वाढत्या संख्येच्या धोक्यात सांगली जिल्हा प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. आरोग्य विभागाने त्यावेळेस इस्लामपूरची जी परिस्थिती होती, ती विचारात घेऊन पुढाकार घेतला आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने आठ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे टाटा कुटुंबियांचे ऋणी आहोत.
मंत्री पाटील यांनी राजेश टोपे हे आमच्या सरकारचा चेहरा आहेत, ते प्रत्येक ठिकाणी पोहचत आहेत आणि घरात दु:खद घटना घडूनही ते राज्याच्या सेवेत सक्रिय आहेत.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले, मार्चमध्ये इस्लामपुरात रुग्ण सापडले, त्यावर पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण मिळवता आले. गंभीर रुग्णांसाठी व्यवस्था नसल्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकायार्ने हे अद्यावत सेंटर उभारले. आंतरराष्ट्रीय दजार्चे इन्फ्रास्ट्रक्चर जलद कालावधीत उभारणी केली आहे. आता डेडिकेटेड सुविधांचा लाभ होईल. उद्यापासून चांगल्या दजार्ची सेवा त्याठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. टाटा ट्रस्टचे एन. श्रीनाथ म्हणाले, टाटा समूह मदत नव्हे तर आपले कर्तव्य करत आहे. राज्याच्या लोकांसाठी काहीतरी करतोय याचे समाधान आहे. आम्ही सरकारसोबत विविध कार्यात नेहमी सोबत राहू.
प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी आभार मानले. तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, डॉ. राणोजी देशमुख, डॉ. साकेत पाटील, सभापती शुभांगी पाटील, देवराज पाटील, अरुण लाड, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
टाटा ट्रस्टच्या पदाधिका-यांनी आॅनलाइन हा कार्यक्रम अनुभवला. जयंत पाटील यांनी इथली जी परिस्थिती आहे ती त्यांना इंग्रजीत आॅनलाइन सादर केली. चांगल्या आणि आंतरराष्ट्रीय दजार्ची यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयसारख्या शासकीय ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. व्यवसाय अनेक लोक करतात पण टाटा कुटुंबिय हे अत्यंत संवेदनशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोना साथीनंतर त्यांना भेटीचे निमंत्रण दिले.
‘जनआरोग्य’चा लाभ मिळणार!
महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील समाविष्ठ हॉस्पिटलची नावे प्रमुख चौकात लावावीत. १००० हॉस्पिटलमध्ये ९७७ आजार आहेत. त्याचा विनामूल्य लाभ सर्व रुग्णांना दिला जाईल. सर्व रुग्णालयात कॅशलेस सेवा मिळेल, तशा सूचना संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.